​सावंतवाडी: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमाभागात भ्रमंती करणारा ‘ओंकार’ नावाचा हत्ती सध्या स्थानिक नागरिक आणि प्रशासनासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. श्री गणेश चतुर्थीच्या काळात सीमेवर वावरणाऱ्या या हत्तीला अनेकांनी गणेश रूप मानून त्याचे दर्शन घेतले. मात्र, तो वर्दळीच्या रस्त्यांवर आणि मानवी वस्तीत येत असल्याने परिसरात काहीसे भीतीचे तर काही प्रमाणात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सावंतवाडी, दोडामार्ग आणि गोव्यातील मोपा परिसरात भ्रमंती करणारा ओंकार हत्ती कास, मडुरा, शेर्ले, आरोसबाग आणि मीठगुळीमार्गे बांदा शहराच्या हद्दीत दाखल झाला. मंगळवारी सकाळी तो आळवाडी परिसरातील तेरेखोल नदीकाठी वावरताना दिसला. त्याला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

​त्यानंतर ओंकारने तेरेखोल नदी पार करून पत्रादेवी गाठले आणि जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरून सुमारे दोन किलोमीटर प्रवास केला. महामार्गावर हत्ती आल्याची बातमी पसरताच दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, ज्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. सायंकाळच्या सुमारास ओंकारने पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास करत तेरेखोल नदी पार केली व बांदा हद्दीतील आरोसबागच्या दिशेने मार्गक्रमण केले.

​ओंकारच्या सततच्या वावरामुळे स्थानिक बागायतीचे नुकसान झाले असून, पत्रादेवी तपासणी नाका परिसरासह महाराष्ट्र आणि गोव्यातील संबंधित यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वनविभागाचे पथक ओंकारच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ​दरम्यान, नागरिकांनी हत्तीचा पाठलाग करणे, त्याचा मार्ग अडवणे, महामार्गावर वाहने थांबवून गर्दी करणे किंवा त्याच्या जवळ जाणे पूर्णपणे टाळावे, असे स्पष्ट आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.