छत्रपती संभाजीनगर : विविध कारणांमुळे साखर कारखानदारी अडचणीत असताना सोलापुरातील ‘ओंकार शुगर प्रा. लि.’ या खासगी साखर उद्योग समूहाने अवाक् करणारी प्रगती साधली आहे. बाबूराव बोत्रे-पाटील यांनी २०१७ मध्ये सुरू केलेल्या या समूहाने गेल्या सहा वर्षांत राज्यातील १४ आणि परराज्यांतील तीन असे एकूण १७ ‘आजारी’ साखर कारखान्यांवर मालकी स्थापन केली आहे.
यंदाच्या गाळप हंगामातील ९८ लाख मेट्रिक टनपैकी ४८ लाख टनहून अधिक उसाचे गाळप ओंकार समूहाच्या कारखान्यांतून झाले आहे. त्याचा साखर उतारा प्रतिक्विंटल १०.३५ एवढा आहे. साखर कारखानदारीचा अनुभव नसताना केवळ दहा वर्षांत एवढी मोठी भरारी घेणार्या या ओंकार शुगरच्या मागे कोणती ‘महाशक्ती’ उभी आहे, अशी चर्चा आता साखर कारखानदारीच्या वर्तुळात होऊ लागली आहे.
उसाची वाढलेला एफआरपी, सहा वर्षांपासून न बदललेला साखरेचा विक्री दर, गैरव्यवस्थापन, गाळप हंगामातील स्पर्धा अशा अनेक कारणांमुळे तोट्यात चाललेल्या राज्यातील साखर कारखान्यांचे कारभारी सरकारदरबारी मदतीसाठी खेटा मारत आहेत. मात्र बाबूराव बोत्रे पाटील यांच्या ओंकार शुगरने याच काळात केलेली प्रगती नजरेत भरणारी आहे.
विशेष म्हणजे बाकी सारे कारखाने अडचणीत असताना या समूहाच्या पाच कारखान्यांनी १०० टक्के ऊस देयक अदा केले आहे. त्यांच्या ‘व्यवस्थापकीय कौशल्या’ची राजकीय पटलावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. या १७ कारखान्यांची तब्बल १२६९ कोटी रुपयांची ऊस देयके होती. या कारखान्यांची प्रतिदिन गाळप क्षमता ४२,९५० टन आहे. गाळप केलेल्या बहुतांश देणी शेतकर्यांना अदा केली असल्याचा अहवाल साखर आयुक्तालयाच्या गाळप अहवलातून दिसतो.
‘आजारी’ जाहीर झालेले किंवा तोट्यात चालणारे साखर कारखाने ताब्यात घ्यायचे आणि त्यांना पुन्हा कार्यरत करायचे, असा ‘कारखाना’च बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तयार झाला आहे. विशेष म्हणजे याचे मोठे लाभार्थी राज्य आणि केंद्रात सत्तेत असलेले भाजपचे नेते-पदाधिकारी आहेत. ओंकार शुगरने ताब्यात घेतलेल्या कारखान्यांमध्ये गोपीनाथ मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासह आणखी काही नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश आहे. या समूहाने ताब्यात घेतलेले नऊ कारखाने खासगी तर पाच सहकारी तत्त्वावर पूर्वी चालत.
यातील पहिला साखर कारखाना घेतानाचे व्यवहार लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातून झाले होते. या काळात बोत्रे पाटील यांच्याबरोबर भागीदारी करणारे अंबादास जाधव म्हणाले, ‘२१ मे २०२१ मध्ये ओंकार काखान्याबरोबर मी एक करार केला होता. सोलापूर जिल्ह्यातील चांदापुरी कारखान्यासाठी ओंकार समूहाने घेतलेल्या कर्जाची रक्कम परत करायची होती, त्यासाठी तयार होणार्या साखर विक्रीचा करार करून त्यांना मी आठ कोटी ३६ रुपयांपेक्षा अधिकची रक्कम दिली होती. ती पूर्ण रक्कम परत देण्यात आली नाही म्हणून पोलिसांमध्येही तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मागे आता राजकीय शक्ती उभी असल्याचे सांगण्यात येते. ’
कारखाने ताब्यात घेण्याचा हा वायू वेग अनेक कारखांनदारांना चकित करणारा आहे. या ‘वेगवान’ प्रगतीची माहिती जाणून घेण्यासाठी बाबूराव बोत्रे यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही. शिवाय त्यांना लेखी प्रश्नही विचारले असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
वैद्यनाथवर ताबा
अलीकडच्या काळात गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ओंकार शुगरने १३१.९८ कोटी रुपयांना विकत घेतला. या कारखान्याची विक्री झाली नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर कारखान्याच्या व्यवहाराची प्रती समाजमाध्यमांमध्ये उपलब्ध झाल्या. पुढे बोत्रे पाटील यांच्या हस्ते वैद्यनाथ कारखान्यात गाळप हंगामाचा शुभारंभही झाला.
साखर उद्योगावरील ‘राष्ट्रवादी’ची पकड ढिली?
साखरेतील गोडी राजकारणात उतरवून पुढे जाणार्या राष्ट्रवादी काँग्रेसची साखर कारखान्यांच्या कारभारावर पकड होती. आजही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले कारखानदार यांचा प्रभाव आहेच. मात्र गेल्या सहा वर्षांत बाबूराव बोत्रे पाटील हे नवे साखरसम्राट म्हणून उदयास आले आहेत. विशेष म्हणजे भाजपच्या बहुतांश नेत्यांनी त्यांचे सहकारी आणि खासगी कारखाने ओंकार शुगरच्या ताब्यात दिले.
