अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीत शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात असलेली ओमकार ट्रॅव्हल्सची प्रवासी बस अचानक नियंत्रण सुटून उलटल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि बचाव पथकाच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी हलविण्यात आले. जखमींवर नागोठणे येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले असून, काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी रोहा, नागोठणे तसेच नवी मुंबईतील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

अपघातावेळी बसखाली एक महिला अडकल्याने तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्याला मोठा विलंब झाला. घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने तिला अखेर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करत वाहतूक पूर्ववत करण्याचे काम केले.

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, बसचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटणे किंवा रस्त्याची स्थिती याबाबत पोलीस तपास सुरू आहे. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.