ओमराजे निंबाळकर यांचं नाव सध्या चांगलंच चर्चेत आहे. याची दोन कारणं आहेत. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात सगळ्या आरोपींची पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दुसरं कारण आहे ऑपरेशन टायगरचं. शिवसेनेचे जे सहा खासदार फुटलेत त्या सहा खासदारांमधलं एक नाव ओमराजे यांचंही आहे अशी जोरदार चर्चात आहे. दिल्लीत ठाकरेंच्या खासदारांचा वेगळा गट तयार झाल्याचं सांगितलं जातं आहे. नेमकं काय घडलंय? हे अधिकृत रित्या समोर यायचं आहे. दरम्यान ओमराजेंनी त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली आहे. तसंच जयराजे निंबाळकर यांनीही खंत बोलून दाखवली.

जयराजे निंबाळकर यांनी पवनराजे प्रकरणावर काय म्हटलं?

जो निकाल लागला तो अत्यंत दुर्दैवी आहे. २०१० मध्ये खटला सुरु झाला होता. तपास सीबीआयकडे गेला होता त्यानंतर या तपासाला गती आली. पद्मसिंह पाटील यांच्या दबावाखालीच कळंबोली पोलिसांनी तीन वर्षांत सगळी व्यवस्था करुन ठेवली. त्यामुळेच आरोपी निश्चित सुटले अशी खंत जयराजे निंबाळकर यांनी बोलून दाखवली आहे.

ओमराजे निंबाळकर काय खासदार फुटीबाबत काय म्हणाले?

माझा जो काही राजकीय निर्णय आहे तो मी सगळ्यांशी चर्चा करुन घेईन. मी माझ्या मतदारसंघात काम करत असताना इथल्या लोकांसाठी धावून जाण्यालाच मी प्राधान्य दिलं आहे. मी वैयक्तिक स्वार्थाला कधीही प्राधान्य दिलेलं नाही. मी लोकांची किती कामं केली आहेत हे त्यांना माहीत आहे. आमच्यासाठी पवनराजे प्रकरणाचा निकाल लागणं हे महत्त्वाचं होतं त्यासाठीच मी राजकीय भूमिका घेण्याबाबत थांबलो होतो. तीन ते चार दिवसांपासून मला ट्रोल केलं जातं आहे. माझ्या केसचा निकाल लावून घेण्यासाठी पक्षांतर करतोय असंही बोललं गेलं. जर पक्षांतर केल्याने निकाल माझ्या बाजूने लागणार होता तर मग मी २०२२ मध्येच तो निर्णय घेतला असता. २०२२ ला पहिल्यांदा पक्ष फुटला तेव्हाच मी निर्णय घेऊ शकलो असतो असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. ओमराजेंनी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी हे विधान केलं आहे.

मी तीन दिवसांपूर्वी एकदम चांगला होतो-ओमराजे

ओमराजे पुढे म्हणाले, मी तीन दिवसांपूर्वी एकदम चांगला होतो, तीन दिवसांतच अशा पद्धतीचं ट्रोलिंग केलं गेलं. ज्या माणसाचं आपल्यावर प्रेम आहे, काहीतरी वाटतं असाच माणूस व्यक्त होत असतो. व्यक्त होण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. कुटुंबातल्या किंवा घरातल्या व्यक्तीवर अतिशय खालच्या पातळीवर जर बोललं गेलं तर तुमचाही जन्म त्याच पद्धतीने झाला आहे जसा माझा झाला आहे. तुम्हालाही तसेच आई-बाप आहेत जसे मला आहेत. मला वाटतं त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही कुणाला. अत्यंत घाणेरडं पद्धतीने बोललं जातं आहे ते दुर्दैवी आहे. काही बोलायचं असेलच तर ते आम्हाला थेट बोला असंही ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. मला जो काही राजकीय निर्णय घ्यायचा आहे त्याबाबत मी माझ्या माणसांशी चर्चा करणार आहे. त्यांचं काय मत आहे आणि जी काही चर्चा करत आलोय त्याचाही उहापोह करणार आहोत. त्यानंतर सार्वमताने आम्ही निर्णय घेऊ.