उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार फुटल्याची चर्चा आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात आल्याचं बोललं जात आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश असल्यामुळे त्यांच्या बंडखोरीची मोठी चर्चा होत आहे. या चर्चेचं कारण म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी याआधी अनेकदा पक्षनिष्ठा, विचारधारा यावरून भाषणं केली होती. त्यामुळे त्यावरूनही आता त्यांना ट्रोल केलं जात आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. आज धाराशिवमधील जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं ओमराजे यांनी सांगितलं आहे. या घडामोडी दरम्यानच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी फादर्स-डे निमित्त सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावनिक पोस्ट व्हायरल होत आहे. ही भावनिक पोस्ट नेमकं काय आहे आणि त्या पोस्टमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी काय म्हटलं आहे? हे जाणून घेऊ.

ओमराजे निंबाळकरांची पोस्ट काय आहे?

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज फादर्स-डे निमित्त एक्सवर (ट्विटर) एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ओमराजे निंबाळकर हे भावुक होत वडिलांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होताना दिसत आहेत. तसेच दिवंगत पवनराजे निंबाळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना दिसत आहेत. या बरोबरच ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचे दिवंगत वडील पवनराजे निंबाळकर यांच्याबरोबरचा एक जुना फोटो देखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं की, “भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी.”

उद्धव ठाकरेंबाबत ओमराजे निंबाळकरांनी काय म्हटलं?

“उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत मी कोणत्याही प्रेसमध्ये अजिबात काहीही बोललेलो नाही. एक लक्षात घ्या, माझी राजकीय भूमिका काहीही ठरली तरी मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत याआधीही कधी काही बोललो नाही, आणि भविष्यात देखील काही बोलणार नाही. मग माझी राजकीय भूमिका काहीही असली तरीही काही बोलणार नाही”, असं ओमराजे निंबाळकर यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.

शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार का?

पक्षांतर करण्याचा निर्णय बदलणार का? असा प्रश्न ओमराजे निंबाळकर यांना शनिवारी विचारण्यात आला होता. यावर बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं होतं की, “मी मतदारंसघात जाऊन सर्वांशी चर्चा करणार आहे आणि त्यानंतर मी माझा पुढचा निर्णय घेणार आहे. माझा अंतिम निर्णय झालेला नाही. मला आपल्याला इतकच सांगायचं की, मी माझ्या लोकांबरोबर चर्चा करुन माझ्या मतदारसंघातल्या जनतेशी चर्चा करून निर्णय घेईल.”