scorecardresearch

“पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”

ओमराजे म्हणतात, “चमचे मंडळी ठेऊन त्यांना सर्वांवर रुबाब…”

“पवनराजेंच्या मुलाशी ‘सामना’ झाला अन् आगीशी…”, निंबाळकरांनी पाटलांना डिवचलं; म्हणाले, “कधीही भिडायला तयार”
ओमराजे निंबाळकर राणा जगतजितसिंह पाटील ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी ( ३ नोव्हेंबर ) झालेली पीक विम्याची बैठक चांगलीच गाजली. या बैठकीत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात खडाजंगी झाली. जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या समक्ष हा प्रकार घडल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील जुने वाद पुन्हा उफाळून आले.

शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण समितीचा बैठक असावी, असे वाटून ओमराजे निंबाळकर आले होते. त्यावेळी ओमराजे निंबाळकर जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोलत होते. तेव्हा राणा जगतजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना ‘बाळ आहेस तू’ असं म्हटलं. यावर ओमराजे निंबाळकर संतापले. ‘मला बाळ म्हणू नको, तू तूझ्या औकातीत राहा, तुमचे संस्कार, तुमची औकात मला सगळं माहिती आहे. जास्त बोलू नको, तुला मी बोललेलो नाही, तुझं बोलायचं कारण नाही,’ असं म्हणत खडसावलं होतं.

हेही वाचा : ‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’ वक्तव्यानंतर प्रसाद लाड यांची दिलगिरी; म्हणाले…

“सोन्याचा चमचा घेऊन व आजूबाजू…”

त्यात ओमराजे निंबाळकरांनी पुन्हा आता फेसबुक पोस्ट करत राणा जगजितसिंह पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. “जिथे मी चुकत नाही तिथे मी झुकत नाही,” म्हणत ओमराजे निंबाळकर म्हणाले, “कलेक्टर कचेरीत संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना त्या आमदाराने त्याच्या नेहमीच्या पद्धतीने विषयाला फाटा द्यावा म्हणून वैयक्तिक मला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ‘सोन्याचा चमचा’ घेऊन व आजूबाजू चमचे मंडळी ठेऊन त्यांना सर्वांवर रुबाब करायची सवय आहे. परंतु, त्यांचा सामना या ‘पवनराजे’ साहेबांच्या मुलाशी झाला आणि आगीशी का खेळू नये हे आता त्याला नक्कीच कळले असेल.”

“आम्ही शांत असतो पण षंढ नसतो”

“त्यांनी संस्कार बद्दल बोलावे म्हणजे पाकिस्तान ने दहशवाद्यांविरोधात बोलावे असे आहे. लोकशाहीत जनता हीच खरी राजा असते, आता लोकांच्या जहागिरी व जहागीरदारी दोन्ही संपल्या आहेत. तुम्ही दहशतीने आम्हाला दाबाल व आम्ही दबू असा गैरसमज आज मिटला असेल. आम्ही शांत असतो पण षंढ नसतो,” असे ओमराजे निंबाळकर यांनी ठणकावलं आहे.

हेही वाचा : भाजपा नेत्याच्या शिवरायांवरील नव्या विधानानंतर संभाजीराजे संतापले; फडणवीसांचे नाव घेत म्हणाले “जमत नसेल तर…”

“कधीही भिडायला आम्ही…”

“समोरच्याला कळेल या भाषेत समजाविले इथून पुढेही गरज पडेल तेव्हा लोकांसाठी कोणालाही कधीही भिडायला आम्ही तयार आहोत. फक्त यांची समोरासमोर करायची नव्हे, तर गुपचूप पाठीमागे करायची सवय आहे. हे ही मी आणि राज्यातील जनता जाणून आहे,” असेही ओमराजे निंबाळकरांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 16:14 IST

संबंधित बातम्या