गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वीच ‘ऑपरेशन टायगर’ राबवण्यात आलं. या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ६ खासदार फोडण्यात आले. या सहाही खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
यामध्ये ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर या खासदारांचा समावेश आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश असल्याने त्यांच्या बंडखोरीची मोठी चर्चा होत आहे. दरम्यान, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच ओमराजे निंबाळकर यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
या चर्चांवर आता ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर हे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिपदाच्या चर्चांवर प्रश्न विचारला. यावेळी ‘मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही’, अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
उद्धव ठाकरे तुमच्या मतदारसंघात सभा घेत आहेत, यावर तुमची प्रतिक्रिया काय? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “मी तुम्हाला एवढंच सांगतो की सर्वसामान्य माणसांना कामांच्या बाबतीत अनेक अडचणी येतात. मी दररोज जनतेत असतो. त्यामुळे लोकांच्या अडचणी सोडवणं, ही माझी पहिली प्राथमिकता आहे. आता सत्तेची जोड मिळाल्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या कामांसाठी आणखी मदत होईल. माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी माझ्या कामांच्या माध्यमातूनच उत्तर देईल”, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं.
तुमच्या रुपाने मराठवाड्याला पुन्हा एकदा मंत्रिपद मिळेल का? असं पत्रकारांनी विचारलं. यावर खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, “मंत्री होणं ही माझी प्राथमिकता नाही. मी अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की सर्वसामान्य माणसांच्या कामांसाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी, मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सत्तेच्या बाजूने आलो आहे. माझी प्राथमिकता मंत्री होणं नाही. माझी प्राथमिकता फक्त सर्वसामाणान्य माणसांची कामे करणं हीच आहे.”
