बीड – उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हे जिल्हा दौऱ्यावर आले असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाने दुचाकीवरील एका कुटुंबाला जोरदार धडक दिल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी तेलगाव-धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे घडली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम सुदे (वय ३०) यांचा सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. त्यांच्यावर लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
अपघाताच्या घटनेनंतरच त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अपघातावेळी विष्णू दामोदर सुदे (वय ३५) वर्षे हे दुचाकीवरून आपल्या कुटुंबासोबत जात असताना अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या बंबाने धडक दिली. या अपघातात सुदे यांच्यासह पत्नी कुसुम सुदे, दोन लहान मुली रागिणी (वय ९) व अक्षरा (६ वर्षे) हे सर्व गंभीर जखमी झाले होते. या सर्वांवर लातूर येथे उपचार सुरू होते. दरम्यान कुसूम यांच्या पार्थिवावर दिंद्रुड येथे मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
