बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करू पाहणाऱ्या स्वराज्य महिला संघटनेच्या महिलांना बुधवारी पुन्हा एकदा स्थानिक महिला आणि गावकऱ्यांनी मारहाण केली. मंदिरातील गर्भगृहात महिलांच्या प्रवेशाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. ती वेळ उलटल्यानंतर गर्भगृहात प्रवेश करू पाहणाऱ्या महिलांना गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरच अडविण्यात आले. यावेळी स्थानिक महिला आणि आंदोलकांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर आपल्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असल्यामुळे देशभरातून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. मंदिर प्रवेशाबाबत लिंगभेद न करण्याच्या न्यायालयीन निर्णयानंतर या मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेशासाठी सकाळी सहा ते सात वाजण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. पण या वेळेनंतर श्रीपूजकांशिवाय कोणालाही मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश दिला जात नाही. यापूर्वीही स्वराज्य संघटनेच्या महिलांना गर्भगृहात प्रवेश मिळवण्यासाठी आंदोलन केले होते. त्यावेळीही महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की आणि हिन दर्जाची वागणूक देण्यात आली होती.