सांगली : येथील नगर भूमापन कार्यालयात दलाली करणाऱ्या प्रमोद काशीनाथ शिंदे याला शुक्रवारी लाच लुचपत विभागाच्या पथकाने तीन हजारांची लाच घेत असताना अटक केली.
तक्रारदार यांच्या वारसाची नोंद करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच द्यावी लागते, असे सांगून तडजोडी अंती ३ हजार रुपयांची देण्याचे मान्य करण्यात आले. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आज सापळा लावण्यात आला होता. सांगली येथील गणेश नाष्टा सेंटर या ठिकाणी सापळा लावला असता प्रमोद शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची मागणी करत तीन हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिंदे याला रंगेहाथ पकडले.
