नाशिक महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत असताना सत्ताधारी मनसेच्या इंजिनाचे डबे घसरु लागले आहेत. रविवारी मनसेतून आणखी एक नगरसेवक बाहेर पडल्याने पक्षाच्या नगरसेवकांची संख्या १३ वर आली आहे. मनसेच्या नगरसेविका सुमन ओहोळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेला धक्का बसला आहे.

रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर मनसेच्या नगरसेविका सुमन ओहोळ आणि त्यांचे पती माजी नगरसेवक विजय ओहोळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मनसेच्या सुमन ओहोळ यांच्यासोबतच अपक्ष नगरसेविका रशीदा शेख, काँग्रेस पक्षाचे नेते व जिल्हापरिषद सदस्य संदीप गुळवे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते त्र्यंबक गायकवाड, उपशहरप्रमुख विशाल पवार, सरचिटणीस प्रशांत रकटे, श्रीराम गायकवाड यांच्यासह ४५ विविध कार्यकारी सोसायटीच्या सदस्यांनी हातावर शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

नाशिकमधील अनेक पक्षांमधील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पक्षाचे संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी, खासदार अरविंद सावंत, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवाजी सहाणे, विलास शिंदे, देवानंद बिरारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक महानगरपालिकेत सत्तेवर आली तेव्हा पक्षाकडे ४० नगरसेवक होते. मात्र आता यामधील तब्बल २७ नगरसेवकांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये मनसेची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.