नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रूक गावामध्ये बिया आणि किटकनाशके विकणाऱ्या एका कंपनीने आयोजित केलेल्या कृषी कार्यशाळेत अन्नामधून विषबाधा झाल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू  तर ७५ शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली आहे. अतुल केदार (वय ४१) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उपचार सुरू असलेल्या काही शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे.

बुधवारी बायर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने उमराळेमध्ये टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. दुपारपर्यंत चाललेल्या या कार्यशाळेनंतर शेतकऱ्यांच्या जेवणाचीही सोय करण्यात आली होती. याच जेवणातून कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक शेतकऱ्यांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या काही शेतकऱ्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र अनेक शेतकरी खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे.

याप्रकरणी दिंडोरी पोलिस स्थानकामध्ये आयोजकांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून कंपनीचे स्थानिक व्यवस्थापक सुनील मुळे आणि कंपनीचे अधिकारी सुनील वडजे आणि सिताराम वाकले यांना अटक केली आहे. गुरुवारी या तिघांना न्यायालयात सादर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मठ्ठा प्यायल्यानंतर सुरु झाला त्रास

कार्यशाळेसाठी उपस्थित असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवण म्हणून खिचडी, जिलेबी आणि मठ्ठा देण्यात आला होता. मात्र जेवणानंतर अनेकांना मठ्ठा प्यायल्यावर त्यांना उलट्यांचा त्रास सुरु झाला.

नमुने तपासासाठी पाठवण्यात आले

या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर कार्यशाळा आयोजित करण्यात आलेल्या उमराळे गावात अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेतली. शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या सर्व अन्नपदार्थांचे नमुने अधिकाऱ्यांनी घेतले असून हे नमुने पुढील तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच विषबाधा नक्की कशामुळे झाली या बद्दल स्पष्टता येईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.