सातारा लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या २६ उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्राची छाननी झाली. छाननीत एक अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक सुखजितसिंह वैस यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली. त्यात पांडुरंग बाबा पाटोळे (अपक्ष) यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले. या पत्रावर किमान १० प्रस्तावकांची आवश्यकता असताना एकच प्रस्तावक असल्याने अर्ज बाद ठरला. तसेच पाटोळे मु. झरे, ता. आटपाडी, जि. सांगली येथे राहणारे आहेत. त्यांनी तेथील मतदारयादीत नाव समाविष्ट असल्याची पुराव्याची साक्षांकित प्रत न जोडल्याने अर्ज बाद ठरल्याचे जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी यांनी सांगितले.
आता लोकसभेच्या रिंगणात खा. उदयनराजे भोसले यांच्यासह पुरुषोत्तम जाधव (अपक्ष), अशोक गायकवाड (महायुती-आरपीआय), प्रशांत चव्हाण (बसपा), राजेंद्र चोरगे (आम आदमी पार्टी), प्रकाश कांबळे (बहुजन मुक्ती पार्टी) यांच्यासह २५ जण रिंगणात आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या अर्थात २९ तारखेला अर्ज माघारी घेतल्यावर नक्की किती उमेदवार िरगणात राहतील हे समजेल.