पतंगाचा मांजा काढताना विजेचा झटका लागलेल्या मुलाचा मृत्यू

आकाश प्रजापतीचा उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू

पतंग उडवताना मांजा विजेच्या तारांमध्ये अडकल्याने तिघांना शॉक लागला

पिंपरी चिंचवडमध्ये पतंग उडवत असताना पतंगाचा मांजा हायटेन्शन वायरमध्ये अडकून विजेचा धक्का लागल्याने तीन मुले जखमी झाली होती. यातील एका मुलाचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. आकाश प्रजापती असे या मुलाचे नाव असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र बुधवारी मध्यरात्री आकाशचा मृत्यूशी सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आला.

पिंपरी चिंचवडमधील थेरगावातील पडवळ नगरमध्ये पतंग उडवत असताना पतंगाचा मांजा हायटेन्शन वायर मध्ये अडकल्यामुळे तीन मुलांना विजेचा झटका लागल्याची घटना बुधवारी घडली होती. आकाश प्रजापतीसह सात वर्षीय आर्यन पांडे आणि चार वर्षीय अभिनंदन पांडे विजेच्या झटक्यामुळे जखमी झाले होते. मात्र यामधील आकाशची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे त्याला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथून त्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले होते. आकाश ८० टक्के भाजला असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर सूसन रुग्णालयात उपचार होते. मात्र बुधवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: One kid died while getting treatment in pimpri chinchwad after high tension electric wire shock

ताज्या बातम्या