तरूणाची हत्या होऊनही पोलीस यंत्रणा संशयितांना अभय देत असल्याची समजूत झाल्याने संतप्त जमावाने मंगळवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे  दुकाने व घरांची तोडफोड करत आग लावली. जमावाच्या दगडफेकीत पाच ते सहा पोलीस जखमी झाले. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला. कुंभमेळ्याच्या बंदोबस्तात अडकलेल्या पोलीस यंत्रणेची या घटनेमुळे एकच धावपळ उडाली. या घटनेनंतर हरसूलमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. मागील आठवडय़ात बोंढारमाळ येथील भागिरथ चौधरी याचा मृतदेह विहिरीत आढळून आला. ही विहीर एका समाजातील व्यक्तीच्या शेतात असल्याने दुसऱ्या समाजात वेगळीच भावना निर्माण झाली. तेव्हापासून धुमसत असलेल्या असंतोषाचा उद्रेक दंगलीत झाल्याचे सांगितले जाते. या घटनेबाबत पोलीस निष्क्रिय असल्याच भावनेतून मंगळवारी ‘हरसूल बंद’ची हाक दिली होती. जमाव पेट्रोलपंप जाळण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांनी हवेत गोळीबार केला. गोळीबारात रामदास गंगाराम बुधड याचा मृत्यू झाला.
कारंजात दंगलीत एकाचा मृत्यू
वाशीम- कारंजा (लाड) मध्ये मंगळवारी सकाळी एका ऑटोचालकाने मुलीची छेड काडल्याच्या वादातून झालेल्या दंगलीत एका जणाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. कारंजामध्ये संचारबंदी लागू केली आहे. छेडछेडीनंतर मुलीच्या नातेवाईकांनी ऑटोचालकास मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर भारती पुऱ्यात दोन समाज समोरासमोर आले. दोन्ही गटाकडून मोठय़ा प्रमाणात दगडफेक करण्यात आली. दरम्यान, दोन युवकांना चाकूने भोसकले. दगडफेकीत चार जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रण करण्यासाठी वाशीम, कारंजा, अमरावती, पुसदवरून पोलीस ताफा, तसेच हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी पाचारण करण्यात आली आहे. सायंकाळी अमरावती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षकांनी शांतता समितीची सभा घेऊन शांतता ठेवण्याचे आवाहन केले.