मुंबई : राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान असलेल्या साखर उद्योगाने यंदा तब्बल एक लाख कोटींच्या उलाढालीचा टप्पा ओलांडला आह़े  याद्वारे राज्याने या उद्योगातील उत्तर प्रदेशची मक्तेदारीही मोडीत काढली आहे. 

गेले वर्षभर राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने ऊसाचे मुबलक पीक आले. त्यामुळे राज्यातील साखर उद्योगाने यंदा चांगलीच कमाई केली असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत. राज्यात चालू गाळप हंगामात गेल्या वर्षीच्या (११.४२ लाख हेक्टर) तुलनेत तब्बल २़ २५ लाख हेक्टर अधिक म्हणजेच १३.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली होती. त्यातच मोसमी पावसानंतरही अधून-मधून पाऊस पडल्याने ऊसाचे पिक चांगले आले असून, आतापर्यंत १०० सहकारी आणि ९९ खासगी अशा १९९ साखर कारखान्यांकडून १३००.६२ लाख टन ऊसाचे गाळप झाले आह़े  अजूनही १९.६२ लाख टन ऊसाचे गाळप बाकी असून यंदा जूनच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत गळीत हंगाम चालण्याची शक्यता साखर आयुक्तालयातील सूत्रांनी व्यक्त केली. 

राज्यात एकीकडे ऊसाच्या लागवडीत वाढ होत असतानात साखरेबरोबरच उपउत्पादनाकडेही कारखान्यांनी लक्ष केंद्रीत केल्याने आजवर तोटय़ात चालणाऱ्या या उद्योगाकडे कमाईचा उद्योग म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. त्यातच यंदा साखरेला विदेशातून मोठी मागणी असल्याने तसेच इथेनॉल आणि विजेलाही मागणी वाढत असल्याने साखर उद्योगासाठी चांगले दिवस आहेत़ यंदाची या उद्योगाची उलाढाल तब्बल एक लाख कोटींच्या पलिकडे गेल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली.  यंदा १९९ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम परवाना घेतला असून त्यातून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दरापोटी (एफआरपी) ४२ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. पश्चिम महाराराष्ट्रील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना ‘एफआरपी’पेक्षा अधिक भाव दिला आहे. राज्यातील साखर उद्योग आजवर केवळ साखरेवर अवलंबून होता. त्यामुळे साखरेच्या दरात चढ-उताराचा मोठा फटका या उद्योगाला बसत होता. मात्र, अनेक साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच इथेनॉल, वीज, औषधे, मद्य उत्पादन सुरू केल्याने कारखान्यांना फायदा होत आहे. यंदा सुमारे ६० साखर कारखान्यांनी सहवीज निर्मिती प्रकल्प सुरू केले असून त्यातून सहा हजार कोटींची उलाढाल झाली आहे. तर १०० कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीच्या माध्यमातून नऊ हजार कोटींचा व्यवसाय केला आहे. अशाच प्रकारे रेक्टीफाईड स्पीरीटमधून पाच हजार कोटी, विविध केमिकल्सच्या माध्यमातून एक हजार कोटी,  खांडसरी उद्योगातून ७१५ कोटींच्या उलाढालीचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही साखर कारखान्यांनी मद्य उत्पादनातून १२ हजार कोटींचा व्यवसाय केला असून या उद्योगातील दोन लाख कामगारांच्या वेतनावर ६०० कोटी तर केंद्र आणि राज्य सरकारला वस्तू आणि सेवा करापोटी तीन हजार कोटींचा महसूल मिळत असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यातील साखर कारखान्यांनी यंदा २६४ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून, पुढील वर्षी ते २३५ कोटी लिटपर्यंत जाईल. तर सहवीज निर्मितीची स्थापित क्षमता २५८२ मेगावॅटपर्यंत गेली आहे.

महाराष्ट्र अग्रस्थानी

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या ताज्या माहितीनुसार (आयएसएमए) देशात ५२१ साखर कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला़  त्यातील ११६ कारखाने अजूनही सुरू आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात १४६.७२ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन झाले असून ,उत्तर प्रदेशात ११३.९५लाख मेट्रीक टन तर कर्नाटकात ६५.८९ लाख मेट्रीक टन साखर उत्पादन झाले आहे.

यंदा प्रथमच राज्यातील साखर उद्योगाची उलाढाल एक लाख कोटींच्या पुढे गेली आह़े  राज्य समृद्ध करण्यात आणि ग्रामीण शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यात या उद्योगाचे मोठे योगदान असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.-शेखर गायकवाड,साखर आयुक्त