अकोल्यात आणखी एक बळी; ५७ नवे रुग्ण

आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू; एकूण रुग्ण संख्या आठशे पार

संग्रहित छायाचित्र

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : शहरात करोनाबाधित रुग्णवाढीचा वेग व मृत्यूचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. शहरात करोनाचा आणखी एक बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृत्यू संख्या ३७ वर पोहोचली. तब्बल ५७ नवीन रुग्णांचीही रविवारी भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येने आठशेचा टप्पा पार करून ८१३ वर पोहोचली. सध्या २३६ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोला शहरात करोनाचा प्रकोप वाढतच आहे. शहरात आणखी एक मृत्यू व ५७ नव्या रुग्णांची नोंद रविवारी झाली. जिल्ह्यातील एकूण १७६ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ११९ अहवाल नकारात्मक, तर ५७ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण रुग्ण संख्या तब्बल ८१३ झाली. आजचा मृत्यू धरुन आतापर्यंत ३७ जणांचे बळी गेले आहेत. त्यापैकी एकाने आत्महत्या केली. दरम्यान, शनिवारी रात्री एका ८५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. ते रजपूतपूरा येथील रहिवासी होते. त्यांना ३१ मे रोजी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाचा करोना तपासणी अहवाल आज प्राप्त झाला. तो सकारात्मक आला असून, त्याची नोंद आजच्या अहवालांमध्ये करण्यात आली.
आज सकाळच्या अहवालानुसार ३८ जणांचे अहवाल सकारात्मक आले. यामध्ये २० पुरुष व १८ महिलांचा समावेश आहेत. त्यामध्ये खदान येथील आठ जण, अकोट फैल, तारफैल, खडकी, जीएमसी क्वार्टर येथील प्रत्येकी चार जण, तर रजपूतपूरा, अंत्री मलकापूर, हरिहरपेठ, वाशीम रोड, छोटी उमरी नाका, द्वारका नगर मोठी उमरी, गजानन नगर, बापू नगर, कैलास टेकडी, तपे हनुमान, देशमुख फैल, दहिहांडा, धु्रव अपार्टमेंट स्त्री रुग्णालयासमोर आणि नायगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार आणखी १९ रुग्णांची भर पडल्याने आज दिवसभरात तब्बल ५७ रुग्ण वाढले. त्या १९ रुग्णांमध्ये सहा महिला व १३ पुरुषांचा समावेश आहे. त्यात खदान चार जण, जठारपेठ तीन जण, तर गोरक्षण रोड, कच्ची खोली सिंधी कॅम्प, अनिकट, गवळीपूरा, दीपक चौक, शिवर, बलोदे लेआऊट, चैतन्य नगर, नायगाव, संत कबीर नगर, गुलजारपूरा आणि बाळापूर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहेत. शहरात घरोघरी सव्र्हे करून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. रुग्ण संख्येसोबतच मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने प्रशासनासह नागरिक चिंतेत पडले आहेत.
आतापर्यंत ६१४६ नमुने तपासणीसाठी पाठवले
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ६१४६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५८६७, फेरतपासणीचे १११ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे १६८ नमुने होते. आजपर्यंत एकूण ६१२० अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ५३०७ आहे, तर सकारात्मक अहवाल ८१३ आहेत.
५४० जणांची करोनावर मात
जिल्ह्यात आतापर्यंत ५४० जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात आज दुपारी सोडण्यात आलेल्या नऊ जणांचा समावेश आहे. त्यातील पाच जणांना घरी सोडण्यात आले, तर उर्वरित चार जणांना विलगीकरण कक्षात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यात सात महिला तर दोन पुरुष आहेत. देशमुख फैल येथील तीन जण, तर गायत्रीनगर, कमला नगर, देवी खदान, सिटी कोतवालीजवळ, सोनटक्के प्लॉट व रामदास पेठ येथील प्रत्येकी एक रहिवासी आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: One more death in akola 57 new patients in district scj