मालेगाव-कांद्याला मातीमोल दर मिळत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुढे आपली व्यथा मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार घडला. त्यानंतर या शेतकऱ्यांनी कांद्याची पिशवी दाखवित शिंदे यांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे शिंदे यांनी गाडी थांबवून त्यांचे निवेदन स्वीकारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेतच सवतासुभा मांडून भाजपच्या साथीने राज्यात सत्तांतर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासन आपल्या दारी म्हणत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाले आहेत. दौऱ्याची सुरुवात शनिवारी त्यांनी नाशिक जिल्ह्यापासून केली. मालेगाव येथे विभागीय बैठकीसह इतर अनेक कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाले. काही महिन्यांपासून कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादकांचा जिल्हा असलेल्या नाशिकच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडण्यासाठी मालेगाव येथील शासकीय विश्रामगृह गाठले.

कांदा उत्पादकांना मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घ्यायची होती. परंतु, पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वाराजवळ अडविले. त्यामुळे नाराज शेतकऱ्यांनी हातात घेतलेली कांद्यांची पिशवी दाखवित विश्रामगृहाबाहेर पडणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी सुरु केली. आ. दादा भुसे यांच्यासह गाडीतून निघालेल्या शिंदे यांनी हा प्रकार बघितल्यावर काही क्षणासाठी गाडी थांबवली. शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारत त्यांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यात येईल, असे सांगत त्यांना दिलासा दिला.

हेही वाचा : राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मराठी माणसाच्या मेहनतीवरच…”

कांद्याचा किलोचा उत्पादन खर्च २० रुपयावर गेला असताना अक्षरश: पाच ते १० रुपये दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी शासनाने प्रती क्विंटल ८०० रुपये प्रमाणे अनुदान द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे, अभिमन पगार, कुबेर जाधव, सतीश पवार, जयदीप भदाणे, चंद्रकांत शेवाळे आदी शेतकरी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Onion farmer show onion bags to cm eknath shinde in nashik pbs
First published on: 30-07-2022 at 16:01 IST