कांदा नुसतं नाव काढलं की आपल्या लक्षात येतं की तो किती जीवनावश्यक आहे. कांदा चिरताना डोळ्यांत पाणी येतं. कांदा घातल्यावर भाज्यांपासून भज्यांपर्यंत आणि थालिपीठांपासून पोह्यांपर्यंत सगळ्याला वेगळीच चव येते. हा कांदा आता चर्चेत आला तो आंदोलनामुळे. दोन दिवसांपूर्वीच कांदा उत्पादकांनी मुंबई आग्रा महामार्गावर घोषणाबाजी करत आंदोलन केलं होतं.

कांदा प्रश्नावर महाविकास आघाडीचं आंदोलन

कांद्याचे गडगडणारे दर, सरकारी दरातून उत्पादन खर्च भरून निघणार नसल्याकडे लक्ष वेधत आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे मंगळवारी सकाळी शेतकरी क्रांती महामोर्चा काढून मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व माजी मंत्री अनिल देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह सीपीएम अर्थात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते गळ्यात कांद्याच्या माळा घालून सहभागी झाले. काही नेते बैलगाडीवर बसले होते. शेतकऱ्यांची मुख्य मागणी म्हणजे सरकारने कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल तीन हजार रुपये दराने करावी आणि यापूर्वी विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल पंधराशे रुपयांचे अनुदान द्यावं.

कांदा आपल्या सगळ्यांसाठीच महत्त्वाचा

अगदी कांदा पिकवणारा शेतकरी असो किंवा कांद्याचे पदार्थ तयार करणाऱ्या गृहिणी असोत. हॉटेल असो, मिसळीची किंवा पोह्यांची गाडी, स्टॉल असो सगळ्यांना कांदा खूपच आवश्यक असतो. कांदा नसेल तर वांदा होतो असंही म्हटलं जातं. या कांद्याबाबत आम्ही तुम्हाला लोकसत्ताच्या क्विझमधून काही प्रश्न विचारणार आहोत. कांद्याची बाजारपेठ कुठे आहे? शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? असे हे सोपे प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं देण्यासाठी तुम्हाला हे क्विझ सोडवता येतंय का बघा.