सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शनिवारी कांद्याने लासलगाव बाजारात प्रति क्विंटलला ५७०० रुपयांचा टप्पा गाठला. आठवडाभरात कांदा भावात १४०० रुपयांची वधारणा झाली आहे. कांद्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे शासनाने व्यापारी वर्गाने त्याची साठवणूक केली काय, याची छाननी सुरू केली आहे.
कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजारात आदल्या दिवशीच्या तुलनेत शनिवारी पुन्हा ३०० रुपयांनी वाढ झाली. सप्ताहाच्या सुरुवातीला साडे आठ हजार क्विंटल असणारी आवक पाच दिवसात १९३५ क्विंटलपर्यंत खाली आली आहे. या दिवशी प्रति क्विंटलला किमान ३१००, कमाल ६३२६ तर सरासरी ५७०० रुपये असा भाव मिळाला. गेल्या सोमवारी ४३०० रुपये भाव होता. मागणी व पुरवठा यामध्ये तफावत निर्माण झाल्यामुळे नाफेड देशातील महानगरांमध्ये दररोज २०० ते ३०० क्विंटल कांदा पाठवत आहे. या माध्यमातून दर आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

निर्यातमूल्य वाढवले, आयातही करणार
नवी दिल्ली: देशात कांद्याचे भाव जवळपास ८० रुपये किलो झाले. सरकारने आता कांद्याच्या किमान निर्यात दरात टनामागे २७५ डॉलर इतकी वाढ केली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे, तसेच कांद्याच्या आयातीसाठी निविदाही काढण्यात आले आहे.किमान निर्यात किंमत टनामागे ४२५ डॉलरऐवजी ७०० डॉलर झाली आहे. त्यामुळे आता कांद्याचे किरकोळ बाजारभाव कमी होतील.

शीवमध्ये ७०० किलो कांद्याची चोरी
मुंबई: शीवमधील भाजी मंडईतून शनिवारी ७०० किलो कांद्याची चोरी उघडकीस आली आहे. वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. वैभव नाईक (५५) या विक्रेत्याचे प्रतीक्षानगर मंडईत दुकान आहे. शनिवारी त्यांना आपल्या दुकानातील १४ कांद्यांच्या गोण्यांची चोरी झालेली आढळली. या ७०० किलो कांदे होते. घाऊक बाजारात त्याची किंमत ३६ हजार रुपये आहे.