सोलापूर : लोकसभा निवडणुकांच्या तिसर्‍या टप्प्याचे मतदान होऊन आठवडाही उलटत नाही, तोच सोलापुरात कांदा दराची घसरण सुरू झाली असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. माढा तालुक्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याना आणलेल्या कांद्याच्या ९३ पिशव्यांना केवळ १० हजार रूपयांचा भाव मिळाला. या शेतकऱ्याने कांद्याच्या लागवडीसाठी केलेला खर्च ६० हजार रूपयांपर्यंत झाला होता. प्रत्यक्षात त्याच्या हातात कांद्याची पट्टी १० हजार रूपये आली.

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कांद्याची आवक घटून १६ हजार ७०० क्विंटलपर्यंत होत असूनही कांद्याच्या दरात वाढ होण्याऐवजी घट होत आहे. लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान ७ मे रोजी झाले. त्याअगोदर सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज २५ हजार क्विंटलपर्यंत कांद्याची आवक होत होती. त्यावर प्रतिक्विंटल दर १४०० रूपये ते २७०० रूपयांपर्यंत मिळत होता. परंतु लोकसभेचे मतदान होऊन आठवडाही होत नाही तोच कांद्याची आवक कमी होऊन सुध्दा कांदा दर वाढण्याऐवजी उलट घटत चालला असल्याचे दिसून येते.

हेही वाचा…सांगली : परिचारिका दिनानिमित्त सांगलीत परिचारिकांचा सन्मान

दोन दिवसांपूर्वी सुमारे २५ हजार क्विंटल कांदा दाखल झाला असता दर घसरण होऊन कमाल दर २२०० रूपये आणि सरासरी दर ११०० रूपये मिळत होता. त्यानंतर कांदा आवक १६ हजार ७०० क्विंटलपर्यंत खाली आली असता दर मात्र एक हजार ते दोन हजार रूपयांपर्यंत मिळाला आहे. सरासरी दरापेक्षा कमी म्हणजे पाचशे रूपयांपर्यंत दर मिळालेल्या कांद्याचे प्रमाण जास्त आहे.

हेही वाचा…राज ठाकरेंचं पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुषमा अंधारेंची क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर टीका

माढा तालुक्यातील दारफळ सीना येथील कांदा उत्पादक शेतकरी पृथ्वीराज चव्हाण यांनी सुमारे ६० हजार रूपये लागवड खर्च करून पिकविलेला ९३ पिशव्या कांदा विक्रीसाठी सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये आणला असता सूर्या लकी ट्रेडर्समध्ये कांद्याला कवडीमोल दर मिळाला. त्याच्या हातात केवळ १० हजार रूपयांची पट्टी आली. लागवड खर्चाच्या २० टक्के खर्च निघाला नाही. त्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांनी खंत व्यक्त नशिबाला दोष दिला आहे. असे अनेक शेतकरी कांदा दर घसरणीमुळे निराश झाले आहेत.