“कांदा सडका असतो असं ऐकलं होतं पण सरकारही सडकचं आहे”; अशी उद्विग्न प्रतिक्रिया सोलापूरमधील कांदा उत्पादक शेतकरी बालाजी शिनगारे यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदील झालेला असताना राजकारणी मात्र सत्ता स्थापनेची आकडेमोड करण्यात व्यस्त असल्याची टीका बालाजी यांनी केली आहे.

मागील पाच वर्षांपासून बेरोजगारीला कंटाळून बालाजी हे पारंपारिक शेतीकडे वळाले. मात्र रात्रंदिवस कष्ट केल्यानंतर अवकाळी पावसाने आपल्या कष्टाची माती केलीय अशी भावनिक प्रतिक्रिया बालाजी यांनी व्यक्त केली आहे. सरकारकडून देण्यात येणारी मदत आपत्तीत अडकलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास खूप उशीर होत असल्याचा आरोप बार्शी तालुक्यामधील कांदलगावच्या बालाजी यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केला आहे.

“सगळं लय अवघड झालं आहे. हे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे. शेतकरी मरायला लागलाय,” असं म्हणत शेतातील ओले कांदे दाखवत बालाजी आपला संताप व्यक्त करतात. “आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं? इथं कामगार मिळत नाही म्हणून पोरं घेऊन आलोय शेतातील ओला कांदा उपटायला. शेती आता काहीच परवडत नाही. केलेला खर्च सुद्धा निघत नाही. आतापर्यंत कांदा नासका होतं ठाऊक होतं पण आता सरकार सुद्धा नासकं आहे हे ठाऊक नव्हतं. यांचाच घोळ मिटत नाहीय तर हे शेतकऱ्यांकडे कधी बघणार,” असा सवाल बालाजी यांनी उपस्थित केला आहे. “इथल्या सरकारला फक्त सत्ता हवीय. पुढचा मुख्यमंत्री माझा की तुझा यासाठी सध्या स्पर्धा सुरु आहे,” अशी टीका बालाजी यांनी केली आहे. “मी एक दिवसाचा मुख्यमंत्री होतो, तुम्ही एक दिवस शेतकरी होऊन दाखवा. मी तुमची पाठ थोपटतो,” असं म्हणत बालाजी यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच आव्हानाच दिलं आहे.

राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने लाखो हेक्टरवरील पीक वाया गेले आहे. यामुळे शेतकरी कमालीचा चिंतेत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कमही मिळावी यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अवकाळी पावसाने विदर्भात सर्वाधिक नुकसान झाले असून येथील कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. राज्यभरातील नुकसान झालेल्या शेतमालाचा लवकरात लवकर पंचनामा संवेदनशीलतेने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता मदतही मोठी असेल, असे सूतोवाचही त्यांनी केले आहे. आज (सोमावारी) याच संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन केंद्राने राज्याला मदत करावी अशी विनंती केली आहे.