कांदा दीडशे रुपयांवर

बाजारात उन्हाळी कांदा संपल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. 

 

उन्हाळी पीक संपल्याचा परिणाम

 

राज्यातील घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा दर आता दीडशे रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.  चांगला कांदा काही ठिकाणी किलोमागे दीडशे रुपयांहून अधिक दराने  विकला जात असून, घाऊक बाजारात ७० ते ९० रुपये किलोने मिळणारा ओला कांदा किरकोळ बाजारात शंभर रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याची  दरवाढ आणखी पंधरा दिवस राहण्याची शक्यता आहे. बाजारात उन्हाळी कांदा संपल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

यंदा पाऊस लांबल्याने कांदा शेतात सडला. आणीबाणीच्या काळात वापरता यावा, यासाठी उत्पादक चाळीतील उन्हाळी कांदा बाजारात पाठवत आहेत. त्यामुळे घाऊक बाजारातील जुन्या कांद्याला प्रतिकिलो १०० ते १२० रुपये दर मिळत आहे.

तुर्कस्तानमधून आयात

तुटवडा भरून निघावा यासाठी केंद्र सरकारने पुन्हा तुर्कस्तानमधून १२ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.  हा कांदा अद्याप आलेला नाही. त्यासाठी आणखी दहा ते बारा दिवस लागणार आहेत. याच काळात राज्यातील कांदा घाऊक बाजारात विक्रीसाठी मोठय़ा प्रमाणात येण्याची शक्यता आहे.

पुण्यातही आवक अपुरी..

पुण्याच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात मंगळवारी (३ डिसेंबर ) जुना आणि नवीन कांद्याच्या एकूण तीस ते चाळीस गाडय़ांची आवक झाली. नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाला असली तरी कांद्याची प्रतवारी तितकीशी चांगली नाही. मात्र, कांद्याची एकूण आवक अपुरी पडत असल्याने नवीन कांद्याचे दर तेजीत असल्याची माहिती मार्केट यार्डातील कांदा व्यापारी गणेश यादव यांनी दिली.

सोलापूरमध्ये दराचा विक्रम..

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत मंगळवारी दुसऱ्या दिवशी आवक झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटल १५ हजार रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. तर स्थिर दर ४२०० रुपये मिळाला. दिवसभरात कांदा व्यवहारात अकरा कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल झाल्याचे कृषिउत्पन्न बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

काही कांद्यांचे दर शंभर रुपये किलोच्या आत आहेत. त्यांचा आकार छोटा आहे. घाऊक बाजारात ६० टेम्पो भरून छोटे कांदे आले आहेत. येत्या काळात ही आवक आणखी वाढणार आहे. – अशोक वाळुंज, कांदा व्यापारी, एपीएमसी, नवी मुंबई

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Onion rate high market akp

ताज्या बातम्या