अहिल्यानगरः शिक्षण विभागाने अहिल्यानगरमध्ये यंदापासून ११ वीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला असून त्याची प्रक्रिया १९ मेपासून सुरू होत आहे, तर ११ वीचे वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी ही माहिती दिली.
अकरावीसाठी ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया यापूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, पिंपरी-चिंचवड या शहरात राबवली जात होती. आता राज्यभर ११ वी प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने राबवली जाणार आहे. मात्र, केवळ राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा- महाविद्यालयांसाठीच ती राबवली जाणार आहे.
मान्यताप्राप्त, अनुदानित, विनाअनुदानित, अंशतः अनुदानित, स्वयम अर्थसहाय्यित अशा सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालयांनी १५ मेपर्यंत शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. जिल्ह्यातील ४७५ पैकी ३५० शाळा, महाविद्यालयांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरताना १० पसंती क्रमांक द्यायचे आहेत. ही प्रक्रिया २८ मेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर प्रवेशाच्या एकूण चार फेऱ्या होतील व पाचवी फेरी खुल्या पद्धतीने गुणवत्तेवर राबवली जाईल. या फेऱ्यांच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी यंदापासून ही पद्धत अवलंबली जात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी कडूस यांनी दिली.
काही जागा राखीव
ऑनलाइन केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवताना व्यवस्थापनासाठी ५ टक्के जागा, अल्पसंख्याकांसाठी ५० टक्के तर त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी (इनहाऊस) १० टक्के जागा राखीव असणार आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश मात्र ऑफलाइन पध्दतीनेच केले जाणार आहेत.——(चौकट२)
८ जणांची समितीकेंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेबद्दल काही आक्षेप असल्यास त्याच्या निराकरणासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद सीईओ यांचे प्रतिनिधी, ‘डायट’चे प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राचार्य आदी ८ जणांचा समावेश करण्यात आला आहे.
प्रवेश क्षमता ८४ हजारांवर
जिल्ह्यात ११ वीसाठी ८२ हजार ४३२ विद्यार्थी संख्येची प्रवेश क्षमता आहे. यंदा दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थी संख्येपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. त्यामध्ये विज्ञान शाखेसाठी २९ हजार ९२३, कला शाखेसाठी २४४०० वाणिज्यसाठी १३ हजार ७२०, संयुक्तसाठी १०८० तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २३०० जागा आहेत. अर्थात ही आकडेवारी सण २०२३-२४ मधील आहे. त्यानंतर काही शाळा, महाविद्यालयांना नव्याने परवानगी मिळाल्याने अकरावीच्या प्रवेश क्षमतेत काहीशी वाढ झाली आहे.