अलिबाग– ऑनलाईन रमी खेळण्याच्या नादामुळे तरूण वयात तो कर्जबाजारी झाला. नंतर कर्ज फेडण्यासाठी चोऱ्या घरफोड्या करू लागला. अट्टल गुन्हेगार बनला. त्याच्या गुन्ह्यांचा घडा भरला आणि पोलीसांनी त्याला जेरबंद केले.
मागील तीन वर्षापासून रायगड जिल्ह्यातील नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील शिहू, मुंढाणी, झोतीरपाडा या गावांमध्ये सतत चोऱ्या आणि घरफोड्यांचे प्रकार होत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. महत्वाची बाब म्हणजे गावांमधील रहिवाशी रात्रीच्या वेळी घरबंद करून भजन अथवा हरीपाठ सप्ताहाकरता बाहेर गेले असतांना त्यांच्या दिड ते दोन तासाच्या कालावधीत घरी घरफोडी होत असे, त्यामुळे गावात दहशतीचे वातावरण होते. गावांमधील लोकांनी रात्रीच्या वेळी घर बंद करून बाहेर पडणेच बंद केले होते.
घरफोड्या करणारा चोर हा स्थानिक गावातीलच रहिवासी आहे अशा चर्चाना उधाण आले होते. पण काही केल्या त्या चोरटयाचा शोध लागत नव्हता. घरफोड्या तसेच घरफोड्यांच्या प्रयत्नांचे सत्र नियमीतपणे सुरूच होते. घरफोड्यांना आळा घालण्याकरीता गावातील नागरिकांनी गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते, सीसीटीव्ही बसविल्यानंतर काही महिने चोरीच्या घटना बंद झाल्या होत्या. त्यामुळे चोरटा हा स्थानिक परिस्थितीचा जाणकार असल्याचा संशय बळावला होता. त्या अज्ञात चोरटयाचा शोध घेणे हे पोलीसांपुढे एक मोठे आव्हान होते.
या घटनांची दखल घेऊन पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या चोऱ्या आणि घरफोड्यांचा समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक, मिलिंद खोपडे यांचे नेतृत्त्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस हवालदार सुधीर मोरे, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, शरद फरांदे, रणजीत खराडे, पोलीस शिपाई ईश्वर लांबोटे, प्रदीप खरात यांचे एक पथक नेमण्यात आले. सदर तपास पथकाने आपापल्या पध्दतीने सदर घरफोडीचा तपास सुरू केला. तपास पथकातील अमोल हंबीर आणि ईश्वर लांबोटे यांनी कौशल्यपूर्ण तपास करून मुंढाणी गावातील आदित्य कुथे याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान धक्कादायक खुलासे समोर आले.
आदित्यला ऑनलाईन रम्मी खेळण्याचा नाद लागला होता. या नादात तो कर्जबाजारी झाला होता. पण तरीही ऑनलाईन रमी खेळण्याचा नाद सूटत नव्हता. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी त्याने चोऱ्यामाऱ्या आणि घरोफोड्या करण्यास सुरूवात केली. यातून मिळालेल्या पैश्यातून महागडे मोबाईल खरेदी करणे सुरु केले. गावातील बंद असलेली घरे फोडायची मिळेल ते घेऊन पसार व्हायचे असा उद्योग त्याने सुरू केला. त्याच्या गुन्ह्यांचा घडा भरला आणि पोलीसांनी त्याला जेरबंद केले. चौकशीदरम्यान त्याचे पाच गुन्ह्यांची कबूली दिली आहे. नागोठणे पोलीस त्याची पुढील चौकशी करत आहेत.
