‘लोक दारू पिऊन पैसे उडवतात. कोणाला वेगळेच नाद असतात. काहीजण पत्ते खेळतात. मला निवडणूक लढविण्याचा शौक आहे,’ हे उद्गार आहेत मोहम्मद किस्मतवाला यांचे. किस्मतवाला यांची दुसरी पिढी निवडणुकीत उतरली आहे. ‘हौस’ या शब्दाचा अर्थ खरोखरच समजून घ्यायचा असेल, तर एकदा औरंगाबाद पूर्वमधून निवडणूक लढविणाऱ्या किस्मतवाला यांना भेटायलाच हवे. ‘घोडा’ चिन्हावर निवडणुकीत उतरणाऱ्या कासीम यांचा मुलगा वडिलांचे नाव पुढे चालावे, म्हणून तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.
माझे, माझ्या पत्नीचे आणि आणखी एखाद्याचे अशी तीन मते पडली तरी चालेल, असे सांगत मिश्किलपणे प्रचार करणाऱ्या कासीम किस्मतवाला यांचे निधन झाले. त्याला बरीच वर्षे झाली. पण निवडणुकीच्या रिंगणात वडिलांचे नाव कायम राहावे, म्हणून मोहम्मद किस्मतवाला यांनी चक्क भूखंड विकला. त्यातून १ लाख ५५ हजार रुपये मिळाले. त्यांनी अर्ज दाखल केला. त्यांना पुरते माहीत आहे की, आपली अनामत रक्कमही जप्त होणार! त्यांचे निवडणूक चिन्ह ‘जेवणाने भरलेले ताट’ आहे. स्वत:च दुचाकीच्या डिकीतून पत्रक काढतात आणि येणाऱ्याला देतात. आता घरातूनही फारसा विरोध होत नाही. कारण पूर्वजांचे नाव चालवायचे असेल तर काय हरकत आहे, असे सगळेच सांगतात, असे त्यांचे म्हणणे आहे.