टीईटी परीक्षेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्य परीक्षा आयोगाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसानी अटक केलेली आहे. त्यांच्याकडे पहिल्या धाडीत ८८ लाखांची रक्कम आणि काही दागिने सापडले होते. त्यानंतर आता दुसर्‍या धाडीत त्याच्याकडे जवळपास दोन कोटी रुपये आणि काही दागिने आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या सर्व घोटळ्यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली आहे.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले आहेत की, “टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे ८८ लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी दोन कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच तीन महिन्यात बाहेर काढले. ”

तसेच, “आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत.” असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

याचबरोबर, “या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल, तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा.” अशी मागणी देखील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पेपरफुटी प्रकरण : तुकाराम सुपेंकडे आणखी घबाड सापडलं ; दोन कोटी रुपये आणि दागिन्यांचा समावेश

पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली असून,या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आलेली आहे. सायबर पोलिसांकडून ही कारवाई केली गेली आहे. सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं. रात्री उशिरा त्यांनी अटक करण्यात आली. शिक्षक पात्रता परीक्षेत पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.