बँक इमारत उदघाटनाच्या कोनशिलेवर राजकारण्यांऐवजी छोटय़ा पडद्यांवरील कलावंतांची नावे कोरली जाण्याचा आनंद खूपच मोठा असल्याचे प्रतिपादन ‘जुळून येती रेशीम गाठी’मधील मेघना फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने केले.
शहर सहकारी बँकेने सावेडी भागात उभारलेल्या मनमाड रस्ता शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन प्राजक्तासह दूरचित्रवाणीतील कलावंत, ‘माझे मन तुझे झाले’ मधील शेखर व शुभ्रा, हरीश दुधाडे व स्वरदा थिगळे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी प्राजक्ता बोलत होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रा. मुकुंद घैसास होते.
‘छोटय़ा पडद्यावरील अंतरंग’ या विषयावर मनोगत व्यक्त करताना प्राजक्ता म्हणाली, की नकारात्मक विचार केला तर जगात कोणीही पुढे जाऊ शकणार नाही. कोणतीही गोष्ट अवघड नाही. त्यासाठी सतत प्रयत्न करत रहा, यश मिळतेच. मेहनतीच्या बळावर अनेक जण नाटय़, सिने व मालिकेत काम करू लागले आहेत. या क्षेत्रात काम करायचे तर प्रचंड मेहनत व वाचन हवेच. आपल्याकडे उपजत काही कला नसली तरी कष्टाने साध्य करता येते. अध्र्या तासाच्या मालिकेसाठी कलाकारांना आठ तास मेहनत करावी लागते.
मूळचा नगरचा असलेला हरीश दुधाडे म्हणाला, की मी शालेय जीवनापासून नाटय़क्षेत्रात काम करत असलो तरी मुंबईपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. कष्ट घेतल्यानेच मलिका व सिनेसृष्टीत प्रवेश होऊ शकला. स्वरदाने हे क्षेत्र सुंदर आहे, काम करत रहा, फळ मिळेलच, अशीच आपली धारणा असल्याचे सांगितले. घैसास यांनीही कॉलेजजीवनात केलेल्या एकांकिकेचे अनुभव सांगितले.
आयटी समितीचे अध्यक्ष गिरीश घैसास यांनी बँकेच्या प्रगतीची माहिती दिली. ज्येष्ठ संचालक सुभाष गुंदेचा यांनी आभार मानले. किरण डहाळे व प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी बँकेचे संचालक, अधिकारी, सभासद, ग्राहक उपस्थित होते.