राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या सहा खासदारांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे तेव्हापासून ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा होत आहे. आता ऑपरेशन टायगरबाबत बोलताना शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे.
‘कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील’, असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, आता प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यावर आमदार कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया देत प्रत्युत्तर दिलं आहे.
कैलास पाटलांनी काय मागणी केली होती?
“तुळजापूरमध्ये चायनीच कंपनीचे सीसीटीव्ही बसवल्याचं आमच्या निदर्शनास आलं होतं. याबाबत ज्या विभागाने काम केलं, त्या विभागाने स्पष्टता देणं गरजेचं आहे. मात्र, अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. हा भाविकांच्या भावनेचा आणि तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. मात्र, असं असतानाही त्या ठिकाणी सीसीटीव्हीचं उद्धघाटन केलं जात आहे”, असं आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं होतं.
प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलं होतं?
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील यांच्याबाबत बोलताना एक मोठा दावा केला होता. आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असल्याचं सरनाईकांनी म्हटलं होतं. सरनाईक म्हणाले होते की, “आमदार कैलास पाटील हे विरोधी पक्षाचे ऑपरेशन टायगरचे दुसरे सदस्य आहेत, त्यामुळे ते प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी अशा पद्धतीचे आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र, कैलास पाटील हे कुठे जातात? काय करतात? किती वाजता घरी जातात, किती वाजता तुळजापूरला येतात, याची माहिती देखील आम्हाला त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून कळेल. जेणेकरून आम्हाला आमचं ऑपरेशन टायगर सोप होईल”, असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं होतं.
सरनाईकांच्या वक्तव्याला कैलास पाटलांनी काय प्रत्युत्तर दिलं?
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याबाबत बोलताना कैलास पाटील म्हणाले की, “माझ्यावर काय सर्वेलन्स ठेवायचा ते ठेवा. त्यांच्या परिवहन विभागाकडे एक गाडी असते, त्या गाडीला कॅमेरे असतात, ती गाडी माझ्या पाठिमागे राहूद्या. मला काहीही अडचण नाही. आता काही गोष्टी मी बोलत नाही. पण योग्य वेळ आल्यानंतर मी बोलेन. तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेला जर तुम्ही टिंगलटवाळीने घेत असाल आणि चायनीज व जापनीज म्हणून तुम्ही तो विषय दुसरीकडे वळून ऑपरेशन टायगरबाबत बोलत असाल तर हे अतिशय दुर्देवी आहे”, असं ते म्हणाले.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
“कैलास पाटील यांना जो योग्य निर्णय वाटेल, तो त्यांनी घ्यावा. मात्र, मी एवढंच सांगतो की, कैलास पाटील यांच्या भावनेचा आदर करणं ही एक मित्राची जबाबदारी असते. आमची मैत्री १०० टक्के कायम आहे. पण राजकीय निर्णय घेण्याच्या बाबतीत त्यांना जे वाटतं, त्या पद्धतीचा निर्णय त्यांनी घ्यावा”, अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
