निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात राहुल गांधींच्या नेतृत्वा इंडिया आघाडीच्या १४० खासदारांचा मोर्चा संसदेपासून रस्त्यावर आला आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांना निवडणूक आयोगाच्या कार्यालायच्या आधी अडवण्यात आलं आहे. ज्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह सगळे खासदार ठिय्या आंदोलन करण्यासाठी बसले आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता संविधानावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं हे विरोधकांचं षडयंत्र आहे असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांबाबत काय विधान केलं?

माझ्या गेल्या दोन तीन दिवसांच्या पोस्टवरून विरोधकांचा नरेटिव्ह किती फोल आहे हे लक्षात येईल. नरेटिव्ह फोल ठरला तरी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. संविधानाने निर्माण केलेल्या संस्था डिस्क्रेडिट करायच्या आणि संविधानावरच प्रश्न निर्माण करायचं हे विरोधकांचं षडयंत्र आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दिल्ली मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी इंडिया आघाडीचं आंदोलन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दिल्लीत इंडिया आघाडीने मोठा मोर्चा काढला आहे. काही खासदार रस्त्यावर ठिय्या करण्यासाठी पोहोचले आहेत. इंडिया आघाडीचे नेते उपस्थित आहेत. दिल्लीत या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. लोकशाही वाचवा, ज्ञानेश कुमारांना हटवा, अशा घोषणा दिल्या जात आहेत. आता पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, असे स्पष्ट विरोधकांनी केले. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयोगाविरोधात विरोधी पक्षाच्या खासदार रस्त्यावर आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरीही खासदारांचा ठिय्या सुरूच आहे.

विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज (६ ऑक्टोबर) दिल्लीत एकत्र येत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी निवडणूक आयोग कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याची आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनामुळे दिल्लीतील सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून राबवल्या जाणाऱ्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) प्रक्रियेत गंभीर अनियमितता आणि गडबड असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. निवडणूक आयोगाने ‘फॉर्म ६’ मध्ये बदल करून भाजपाला धार्जिणी भूमिका घेतली, असा आरोप राहुल गांधी यांनीही केला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.