scorecardresearch

“त्यांना हे सांगावं लागतं, यातच सगळं आलं”, उदय सामंतांच्या ‘त्या’ विधानावर ठाकरे गटाकडून सूचक विधान!

“देवदर्शनाला आमचा काही आक्षेप नाही. पण सगळ्यात आधी…”, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं टीकास्र!

shivsena ambadas danve uday samant
ठाकरे गटाचं उदय सामंतांच्या दाव्यावर टीकास्र! (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह शिंदे गटातील इतर आमदार आज पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर असताना त्यावरून राजकारण तापलं आहे. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांनी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं होतं. या पार्श्वभूमवीर शिंदे गटातील आमदारांनी विमानतळावर माध्यमांशी बोलताना विरोधकांवर टीकास्र सोडलं आहे. मात्र, त्याचवेळी काही आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. शिंदे गटात फूट पडल्याची किंवा काही आमदार नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगत असताना विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे.

“देवदर्शनाला आमचा आक्षेप नाही, पण..”

अंबादास दानवे यांनी टीव्ही ९ शी बोलताना शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याला लक्ष्य केलं. “ज्याच्या त्याच्या आस्थेचा हा विषय आहे. पण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा, अतीवृष्टीचा प्रश्न आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी २२०० कोटींचा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे पडून आहे. त्यासाठी उपसमितीच्या बैठकीची आवश्यकता आहे. पण मुख्यमंत्र्यांना ही बैठक घेण्यासाठी वेळ नाही. जनतेचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. पण देवदर्शनासाठी वेळ आहे. देवदर्शनाला आमचा काही आक्षेप नाही. पण सगळ्यात आधी जनता-जनार्दनच आपला परमेश्वर आहे. महाराष्ट्रानं हे सगळं बघावं”, असं अंबादास दानवे यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरेंची बुलढाण्यात सभा

उद्धव ठाकरेंच्या बुलढाण्यातील सभेसंदर्भात अंबादास दानवेंनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “मुंबईच्या बाहेर उद्धव ठाकरेंची पहिलीच मोठी सभा आहे. शिवतीर्थावरच्या सभेपेक्षा विराट सभा बुलढाण्यात होणार आहे. या भागात खासदार, आमदारांनी केलेल्या गद्दारीविषयी जनतेच्या मनात संतप्त भावना आहेत”, असं ते यावेळी म्हणाले.

“गुवाहाटीहून परत येताना आमच्यासोबत…”, उदय सामंतांचा मोठा दावा; ठाकरे गटाची चिंता वाढणार?

दरम्यान, शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चांवर उदय सामंतांनी केलेल्या विधानाची अंबादास दानवेंनी खिल्ली उडवली. “चर्चा काहीही असो, आम्ही सगळे एकसंघ आहोत. येताना कदाचित आमच्यासोबत जास्त लोक असतील”, असं उदय सामंत म्हणाले होते. त्यावरून दानवेंनी टोला लगावला. “उदय सामंतांना हे सांगावं लागतं की ते एकसंघ आहेत, यातच सगळ्या गोष्टी आल्या. त्यांच्या सांगण्याचा हाच अर्थ आहे की ते एकसंघ नाहीत”, असं दानवे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 11:54 IST