राजस्थानात सत्तासंघर्ष घडवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी ५०० कोटी जमवले असा आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्याला चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाची गरज आहे. अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सचिन सावंत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या दोन दिवसांमध्ये काय घडलं याबाबत त्यांनी झी चोवीस तास या वृत्तवाहिनीशी चर्चा केली. यामध्ये जेव्हा त्यांना काँग्रेसच्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी तिखट शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?
“महाराष्ट्र भाजपावर ज्या कुणी राजस्थान नाट्यासाठी ५०० कोटी जमवल्याचा आरोप केला आहे तो कुणी लावला मला मला ठाऊक नाही कारण मी दिल्लीत होतो. पण ज्या कोणत्या काँग्रेस नेत्याने हा आरोप केला आहे त्याची आधी मानसोपचार तज्ज्ञाकडून तपासणी करुन घ्या. प्रसिद्धीसाठी काँग्रेसचे नेते काहीही बडबड करतात. यांचे आरोप कुणाला खरे वाटणार? असं कुठे घडतं का? खरंच मला वाटतं की ज्या काँग्रेस नेत्याने हा आरोप लावला आहे त्याला चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे.”

सचिन सावंत यांचा आरोप काय?
राजस्थानात ऑपरेशन लोटस राबवण्यासाठी महाराष्ट्र भाजपाने मुंबईतल्या व्यावसायिक आणि बिल्डर यांच्याकडून ५०० कोटी जमवले आणि ते राजस्थानला पाठवले. असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कालच केला होता. या आरोपाला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

काँग्रेसने आधी तिघाडी सांभाळावी
काँग्रेसने आधी आपली तिघाडी सांभाळावी, भाजपाची चिंता करु नये आम्ही आमच्या जागी भक्कम आहोत असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे. काँग्रेसने आधी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावं तो पक्ष नीट सांभाळावा. महाराष्ट्र भाजपातले काही नेते आमच्या संपर्कात आहेत असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला होता. या दाव्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. करोनाच्या काळात महाराष्ट्राची काय अवस्था तीन पक्षांच्या सरकारने केली आहे आधी ते बघा असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसमध्ये रस नाही
महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस राबवण्यात आम्हाला कोणताही रस नाही. सध्या आम्ही महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल यावर लक्ष केंद्रीत करतो आहोत. आम्हाला सरकार पाडण्यात सध्या काहीही रस नाही असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.