महाराष्ट्रात शेतक-यांच्या आत्महत्यांमध्ये चाळीस टक्के वाढ झाली असताना लोकांना अच्छे दिनाचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात शेतक-यांच्या समस्यांकडे पाठ फिरवली असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
विखे म्हणाले, केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतक-यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढत असताना शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी बरोबरच दुष्काळग्रस्त भागासाठी पॅकेज जाहीर करण्याऐवजी सरकार मराठवाडय़ाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतक-यांसाठी काही करण्याची सरकारची इच्छाशक्तीच नाही. गोहत्या बंदी करून सरकारने शेतक-यांकडील पशुधन संपवले. आता नापिकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांशिवाय दुसरा पर्याय शेतक-यांसमोर राहिला नाही.
राज्य सरकारला खरोखरच पैशाची टंचाई असेल तर महामंडळावरील खर्चात कपात करावी आणि तोटय़ातील महामंडळे तातडीने बंद करून वर्षांकाठी ८०० ते १ हजार कोटी रूपयांची बचत करावी. त्यातून जनतेच्या हिताची कामे करावीत. मात्र सरकार तसे करण्याचे धारिष्टय़ दाखवत नाही. उलट राज्यातील मंदिराकडे असलेले पैसे काढून घेण्याचा सपाटा चालवला आहे. सरकारच्या बुध्दीची ही वैचारिक दिवाळखोरीच आहे. भाविक सरकारकडे पाहून नव्हे तर, भक्तीपोटी मंदिरांच्या दानपेटीत दान टाकतात्मंदिर परिसरात भक्तांच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठीच या दानाचा वापर केला पाहिजे. मात्र सरकारने आता मंदिरातील पैसाच काढून घेऊन तो अन्यत्र वापरण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. राज्य सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अन्यथा सरकारला मोठय़ा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा विखे यांनी दिला.
साईबाबा संस्थानकडील मोठा निधी सरकारने जलशिवार योजना व आरोग्य विभागासाठी पळवला आहे. वास्तविक साईसंस्थानचा निधी शिर्डी व परिसराच्या विकासासाठीच खर्च करणे आवश्यक आहे.  तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतक-यांना कालव्याद्वारे पाणी मिळावे यासाठी हा निधी द्यावा यासाठी आपला प्रयत्न असताना सरकार मात्र संस्थानचा निधी जिल्ह्याबाहेर पळवत आहे. सरकारच्या या कृतीचा आपण निषेध करतो. हा निधी बाहेर देण्यास आपला विरोध असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले.