छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्यांनी शिवजयंतीदिनी अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या भूमिपूजनाची केलेली घोषणा पूर्णत्वास जाऊ शकली नाही, हे दुर्दैव असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली. या स्मारकाची अपेक्षा राज्यालाच नव्हेतर देशालाही आहे. मात्र घोषणेनंतरही त्याची सुरुवात करण्यास राज्याच्या आणि देशाच्या प्रमुखांना वेळ नसावा, असा टोला त्यांनी लगावला.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यावर आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती सोहळय़ात विखे बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के या वेळी उपस्थित होते.  
राधाकृष्ण विखे म्हणाले, शिवाजीमहाराजांचे स्मारक उभे करण्याचा मार्ग काँग्रेस आघाडी सरकारनेच मोकळा केला होता. महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिवरायांचा विचारच महत्त्वपूर्ण ठरला. िहदवी स्वराज्याची निर्मिती करताना जो विश्वास महाराजांनी रयतेपाटी मिळविला होता तो महत्त्वपूर्ण होता. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या उभारणीसाठी ज्या क्रांतिकारकांनी विचारांच्या आधारावर लढा उभा केला अशांपैकीच शिवछत्रपती हे युगपुरुष म्हणून पुढे आले. महाराजांच्या विचारानेच हे राज्य पुढे आले. मात्र या राज्यातच आज विचार संपवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. महाराजांच्या विचारांनी अशी शिकवण कधी दिली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.