शेतकऱयांच्या कर्जमाफीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्न करणाऱया विरोधकांनी मंगळवारी धनगर आरक्षणाचा मुद्दा लावून धरत विधानसभेतून सभात्याग केला. हा मुद्दा मांडण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार खास धनगरांच्या वेशात विधान भवनात आले होते. डोक्यावर पिवळ्या रंगाचा फेटा, खांद्यावर घोंगडं आणि हातात काठी घेत विरोधी पक्षाचे सदस्य सभागृहात आले होते. धनगर आरक्षणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनापासून विरोधकांकडून लावून धरण्यात येत आहे. धनगर समाजाला आरक्षण देणार असे निवडणुकीपूर्वी भाजप सांगत होता. मात्र त्या पूर्ण करण्याकडे या शासनाची वाटचाल दिसत नाही, अशी टीका यावेळी विरोधकांकडून करण्यात आली.
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या १५ वर्षांतील नियोजनशू्न्य कारभाराचे विधानसभेत वाभाडे काढल्याने विरोधकांना त्या आघाडीवर नरमाईची भूमिका घ्यावी लागल्यानेच त्यांच्याकडून धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आल्याची चर्चा सत्ताधारी वर्तुळात आहे.
कर्जमाफीचा विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱयांना फायदा होत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्याही कमी झालेल्या नाहीत, मग कर्जमाफी कशासाठी करायची, असा प्रश्न फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित केला आणि कर्जमाफी करणार नसल्याचे स्पष्ट केले. शेतकऱयांच्या सातबाऱयावरील कर्जाचा बोजा कायमस्वरुपी मिटवून टाकण्यासाठी राज्य सरकार सर्व प्रयत्न करेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर दुष्काळाच्या स्थितीत अडकलेल्या शेतकऱयांसाठी कर्जाचे पुनर्गठन करून पहिल्या वर्षासाठी व्याजमाफी देण्याचा निर्णयही त्यांनी जाहीर केला.