आयाराम, गयाराम जय श्रीराम! विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा

अधिवेशनासाठी जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील आले तेव्हा आयाराम गयाराम जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या

नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विधानभवनात येताच विरोधकांनी आयाराम गयाराम, जय श्रीराम या घोषणा दिल्या. आजपासून राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनाच्या आधी जेव्हा विधीमंडळात मंत्री यायला सुरूवात झाली तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी केली. राज्य सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पडला. आता आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. या अधिवेशनासाठी जेव्हा राधाकृष्ण विखे पाटील आले तेव्हा आयाराम गयाराम जय श्रीराम अशा घोषणा देण्यात आल्या. विकासाची सगळी स्वप्ने भंग, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तारात दंग अशाही घोषणा देण्यात आल्या.

आले रे आले चोरटे आले असं म्हणत विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि मुख्यमंत्री असा सामना पाहण्यास मिळाला. गेली साडेचार वर्षे जे राधाकृष्ण विखे पाटील विरोधी बाकांवर बसले होते ते आता भाजपा सरकारचे मंत्री म्हणून समोर आले. कारण त्यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांना रविवारीच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गृहनिर्माण हे खातं त्यांना देण्यात आलं. ते आज अधिवेशनासाठी येताच आयाराम गयाराम जय श्रीराम या घोषणा दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाला म्हणजेच सुजय विखे पाटील यांना भाजपाने पक्षात घेतले. अहमदनगरमधून सुजय विखे पाटील हे भाजपाच्या तिकिटावर निवडूनही आले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचा औपचारिक प्रवेश होणेच बाकी होते. जो झाल्यानंतर काल म्हणजेच रविवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्री म्हणून स्थान देण्यात आले.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना मंत्रिपद कसे काय दिले जाऊ शकते? एखाद्या पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्यावर मंत्रीपद देणे योग्य आहे का? असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात उपस्थित केला.  त्यांच्या प्रश्नाचा रोख राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळालेल्या मंत्रिपदावर होता. तसेच त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचीही मागणी केली. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड योग्य त्या प्रक्रियेप्रमाणेच झाली आहे असे स्पष्ट केले.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Opposition party members slogans against radhakrishna vikhe patil in vidhan bhavan scj

ताज्या बातम्या