सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी उपसा सिंचन योजना अद्यापि अपूर्ण असताना उजनी धरणाचे पाणी लाकडी निंबोडी योजनेच्या नावाखाली इंदापूर आणि बारामतीला नेण्याच्या निर्णयाविरूध्द सोलापूरकरांचा रोष वाढला आहे. विशेषतः सोलापूरचे पालकमंत्री असूनही त्यांनी सोलापूरकरांचा विरोध डावलून उजनीचे पाणी स्वतःच्या इंदापूरसह बारामतीला उचलून नेणे सोलापूरवर अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत सोमवारी दुसऱ्या दिवशीही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिरात आंदोलक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सद्बुध्दी द्यावी म्हणून महाआरती केली. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारत आंदोलकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपाला बळी न पडता महाआरती म्हटली गेली. जनशक्ती संघटनेचे नेते अतुल खुपसे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शेतकरी संघटनेचे नेते माऊली हळणवार, सोमेश क्षीरसागर, राज सलगर, भाजप अनुसूचित जाती-जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते महाआरतीसाठी सिध्देश्वर मंदिरात एकत्र आले होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते आले असता त्यांना पोलिसांनी मंदिरात प्रवेश नाकारत परत पाठविले.
मंदिरात महाआरती होण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना परवानगी नाकारत त्यांना मंदिराबाहेर जाण्यास बजावले. परंतु कार्यकर्ते महाआरतीसाठी ठाम राहिले. मंदिरात आरती करणे गुन्हा ठरत नाही. तो सर्वांचा अधिकार आहे. यात मंदिरात कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याचा प्रश्नच निर्माण होऊ शकत नाही, असे पोलिसांना सुनावत अखेर आंदोलकांनी महाआरती म्हटली.
दरम्यान, महाआरती झाल्यानंतर आंदोलनाचे नेते अतुल खुपसे हे प्रसार माध्यमांशी बोलत असताना पोलिसांनी पुन्हा मनाई केली. मंदिराच्या परिसरात प्रसार माध्यमांशी बोलता येणार नाही, असा दंडक घालण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता खुपसे यांनी आपली बाजू मांडली आणि प्रसार माध्यमांशी संवाद साधत उजनी धरणातील पाणी उचलून इंदापूर व बारामतीला नेण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
उजनी धरणातील पाणी लाकडी निंबोणी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून इंदापूर व बारामती तालुक्यात नेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ३४८ कोटी खर्चाच्या या योजनेला प्रशासकीय मान्यताही मिळवून देण्यात आली आहे. या योजनेद्वारे इंदापूर व बारामतीच्या १७ गावांतील सुमारे ७२५० हेक्टर क्षेत्रास उजनीचे पाणी मिळणार आहे. या निर्णयाला सोलापूर जिल्ह्यातून विरोध वाढला आहे. विशेषतः दत्तात्रेय भरणे हे सोलापूरचे पालकमंत्री असताना त्यांनी स्वतःच्या इंदापूरसह बारामतीला उजनी धरणातून पाणी उचलून नेण्याचा प्रकार पालकमंत्री म्हणून त्यांना अजिबात शोभत नाही. त्यांचे हे कृत्य दरोडेखोरीचे आहे, अशा शब्दात अतुल खुपसे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. काल पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या किनारी दत्तात्रेय भरणे यांच्या निवाने म्हसोबा बसवून उजनीचे पाणी अन्यायाने उचलून इंदापूर व बारामतीला पळवून नेण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदवत आंदोलन सुरू झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोलापुरात हे आंदोलन पोहोचले.