परभणीतील १२० मुन्नाभाईंवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

जिल्ह्यात बनावट डॉक्टरांची शोध मोहीम सुरू झाली असून, प्राथमिक तपासात १२० संशयित बनावट डॉक्टर आढळून आले आहेत. या डॉक्टरांकडील प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर बनावट डॉक्टरांवर, तसेच फरारी बनावट डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात बनावट डॉक्टरांची शोध मोहीम सुरू झाली असून, प्राथमिक तपासात १२० संशयित बनावट डॉक्टर आढळून आले आहेत. या डॉक्टरांकडील प्रमाणपत्रांची तपासणी केल्यानंतर बनावट डॉक्टरांवर, तसेच फरारी बनावट डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात बनावट डॉक्टर शोध मोहिमेबाबत आयोजित बैठकीला उपजिल्हाधिकारी श्रीमती राऊत, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे सुनील जैतापूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. एम. टी. जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शंकरराव देशमुख, डॉ. कल्पना सावंत, औषध निरीक्षक अरुण गोडसे आदी अधिकारी उपस्थित होते. अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणे बेकायदा असून हे सर्व गुन्हे दखलपात्र व अजामिनाचे ठरविले आहेत. बनावट डॉक्टरांवर कारवाईप्रमाणेच जिल्ह्यात अनधिकृत वैद्यकीय/परिचर्या शिक्षण देणारी महाविद्यालये, संस्था आहेत का याचीही पाहणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सिंह यांनी दिले. महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियमानुसार नोंदणीकृत नसलेल्या व्यावसायिकांचे प्रमाणपत्र तपासून संबंधित परिषदेकडे नोंद झाले किंवा कसे याचा शोध घेणे, हे प्रमाणपत्र राज्यात कार्यरत विविध वैद्यकीय परिषदांच्या नियमानुसार नोंदणीकृत आहे की नाही याचीही सविस्तर तपासणी करण्याचे निर्देश बठकीत देण्यात आले.
बनावट डॉक्टर शोध मोहीम सुरू करण्यापूर्वी अशा संशयित डॉक्टरांची माहिती गोळा करण्यात आली. उपलब्ध माहितीनुसार तपासणी केल्यानंतर परराज्यातील बनावट डॉक्टर पळून गेल्याची माहिती बठकीत देण्यात आली. जिल्ह्यात प्राथमिक तपासात आढळून आलेल्या संशयित डॉक्टरांची संख्या पुढीलप्रमाणे – परभणी महापालिका २०, परभणी ११, पूर्णा ४, जिंतूर ५२, मानवत १६, पालम ३, गंगाखेड ३, पाथरी ६, सेलू ५, सोनपेठ ३.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Order to crime on 120 munnabhai in parbhani

ताज्या बातम्या