शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर समर्थक आमदारांसह बंड पुकारल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या बंडानंतर महाराष्ट्रात राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र काँग्रेसने या राजकीय परिस्थीतीवर चर्चा करण्यासाठी महत्वाची बैठक बोलावली आहे. तसेच काँग्रेसमधील सर्व आमदारांना तातडीने मुंबई गाठण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.

काँग्रेसच्या काही नेत्यांचा फोन नॉट रिचेबल
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ४४ आमदारांपैकी ४२ आमदार या बैठकीत सहभागी आहेत. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आता एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या बैठकीसाठी सर्व काँग्रेस आमदारांना निरोप पाठवण्यात आले होते. परंतु, काही आमदरांचा फोन नॉट रिचेबल येत असल्यामुळे काँग्रेस नेत्यांची झोप उडाली होती.

लाईव्ह लोकेशन पाठवण्याचे आदेश
मात्र, सर्व आमदार काँग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात आहेत. आमदरांचा फोन नॉट रिचेबल येत असल्याच्या अफवा असल्याचा खुलासा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला होता. सर्व काँग्रेस आमदारांना लवकरच सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार असून कोणत्या आमदाराने बंड करु नये यासाठी त्यांचे लाईव्ह लोकेशन पक्षांच्या नेत्यांना पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.