एसटी सेवा ठप्प झाल्याने सामान्य गरीब रुग्णांचेही हाल

एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांबरोबरच सामान्य रुग्णांनाही बसला आहे.

सोलापूर : एसटी बस कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका सोलापूर जिल्ह्यातील पर्यटकांबरोबरच सामान्य रुग्णांनाही बसला आहे. विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी परगावहून येणाऱ्या गरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वाचा आधार मानले जाते. सोलापूर जिल्हा ग्रामीणसह शेजारच्या उस्मानाबाद, लातूर तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील विजापूर, बीदर, गुलबर्गा आदी भागातील रुग्ण सोलापुरात येणे पसंत करतात. शासकीय रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयांमध्ये स्थानिक रुग्णांपेक्षा परगावच्या रुग्णांचीच गर्दी जास्त असते.

बहुतांशी सामान्य गरीब रुग्णांना सोलापूरला वैद्यकीय उपचारासाठी येण्याकरिता मुख्यत: एसटी प्रवास करावा लागतो. परंतु एसटी कर्मचारी संपामुळे एसटी बससेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे सामान्य रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

खासगी वाहनाने प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवड नसल्यामुळे रुग्णांना वैद्यकीय उपचार घेणे अडचणीचे ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दररोज बाह्य उपचार विभागात सरासरी १७०० रुग्ण येतात. यात ६० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण परगावचे असतात. गेल्या दोन दिवसांत ही रुग्णसंख्या एक हजारापर्यंत खाली आली आहे. वैद्यकीय उपचारासाठी खासगी रुग्णालयात होणारा खर्च परवडत नाही. खूपच आजारी किंवा गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना खासगी वाहनाचा आधार घेणे अनिवार्य असते.

इतर सामान्य रुग्णांना एसटीचाच आधार घ्यावा लागतो. एसटी बंद असल्यामुळे गरीब रुग्णांना सोलापूरला येणे कठीण झाले असून वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या इतर खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. दुसरीकडे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी काही दिवस दाखल झालेल्या रुग्णांना गावी परतण्यासाठी एसटी बससेवा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ordinary patients disruption st service ysh

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या