सेंद्रिय बियाणे उत्पादक शेतकरी गटांचा विरोध

प्रशांत देशमुख, लोकसत्ता 

वर्धा : जनुकीय बियाणे लोकांचे आरोग्य व पर्यावरणास हानीकारक असल्याची भूमिका घेऊन त्याविरोधात लढणाऱ्या सेंद्रिय बियाणे उत्पादक शेतकरी गटांनी आता जनुकीय बियाणे विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासनावर नव्याने दबाव आणण्याची भूमिका घेतली आहे. जनुकीय बियाणे समर्थक असणाऱ्या शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेने जनुकीय बियाण्यांबाबत आग्रही भूमिका घेतल्याने या वादाला नव्याने तोंड फुटण्याची चिन्हे आहे.

सेंद्रिय बियाणे समर्थक असणाऱ्या ‘बीजोत्सव’ या संघटनेसह राज्यातील ७० संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून जनुकीय बियाण्यांचा साठा व लागवडीखालील असलेले क्षेत्र नष्ट करण्यासाठी गळ घातली आहे. या वर्षी देखील महाराष्ट्रातील विविध भागात एचटीबीटी कापूस व बीटी वांगी यांची बेकायदेशीर लागवड होत आहे. करोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर या जनुकीय वाणांचे बियाणे बांगलादेश व अन्य देशातून तस्करीच्या माध्यमातून महाराष्ट्रात येत आहे. हा सर्व व्यवहार बेकायदेशीर असल्याने शेतकऱ्याला बियाणे खरेदीची पावती मिळत नाही. त्यामुळे फसवणूक होत आहे. भरघोस उत्पादनाचे आमिष दाखवून किंवा गावातील प्रतिष्ठित मंडळीकडून दबाव आणून अशा बियाण्यांची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले जात असल्याचा आरोप बीजोत्सवने केला आहे.

जनुकीय वाण हे बेकायदेशीर असल्याचे म्हटले जाते. कारण केंद्र शासनाने या बियाण्यांवर बंदी घातली असून लागवड करणाऱ्यास पाच लाख रुपयाचा दंड व पाच वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या वाणांसाठी शेतकरी संघटना आग्रही आहे. जगात नवे तंत्रज्ञान शेतकरी उपयोगात आणतात. भारतात मात्र त्यास मनाई आहे. ही मनाई टळावी, म्हणून संघटनेने गतवर्षीपासून ‘मी पण गुन्हेगार’ या नावाने जनुकीय वाणांची मोठय़ा प्रमाणात लागवड केली. काहींवर कारवाईसुद्धा झाली. कोविडमुळे शहरातील मजुराचा रोजगार संपला असून हे मजूर आता खेडय़ाकडे वळले आहेत. त्यांना रोजगार देण्याची ताकद खेडय़ातच असल्याने जनुकीय वाण हे त्यावरचे उत्तर असल्याचे शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष सतीश दाणी यांनी स्पष्ट केले.

याला तेवढाच टोकाचा विरोध सेंद्रिय बियाणे उत्पादक संघटना करीत आहे. बीजोत्सव, चेतना विकास (वर्धा), संदेश (गडचिरोली), स्नेहप्रेम (अहमदनगर), परिवर्तन (उस्मानाबाद), निर्णय (ठाणे), अटल प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग), आधार (धुळे), प्रसाद चिकित्सा (पालघर) अशा व अन्य संघटना तसेच वसंत फुटाणे, सतीश गोगुलवार, डॉ. तारक काटे, आकाश नवघरे, रुख्मिणी राव व या क्षेत्रातील अन्य मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या भावना कळवल्या. जीएम बियाण्यांचे तंत्रज्ञान पर्यावरण स्नेही नाही. तणनाशकांना प्रोत्साहन मिळते. पर्यावरणाची हानी होते. हे सर्व टाळण्यासाठी प्रथम बियाणे पुरवणाऱ्या कंपनीचा परवाना रद्द करण्याची भूमिका शासनाने घेणे या गटास अपेक्षित आहे. एचटीबीटी बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले.

मात्र बियाण्यांचा उगम कधीच तपासल्या गेला नाही. बीज निर्मितीचे स्थळ नष्ट करणे अपेक्षित आहे. त्यासाठी बेकायदेशीर लागवडीची हाताळणी हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त होते. जनुकीय बियाण्यांना जाहीर विरोध दर्शवणारे आकाश नवघरे म्हणाले की, या बियाण्यांच्या लागवडीस प्रोत्साहन देणाऱ्याविरोधात शासनाने विशिष्ट चमू गठित केली पाहिजे. शेतकऱ्यांकडून असे बियाणे सरकारने जमा करावे व बियाण्याचा खर्च दय़ावा. पुढे हा खर्च अवैध बियाणे उत्पादन करणाऱ्या लोकांवर ठोकावा. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने देशी बियाण्यांच्या प्रसारासाठी प्रयत्न करावे. आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्र्यांना कळवल्या आहे. कारवाई होण्याची अपेक्षा ठेवतो.

जनुकीय बियाणे समर्थक व शेतकरी संघटनेच्या ज्येष्ठ नेत्या सरोज काशीकर यांनी जनुकीय बियाणे हा शेतकऱ्यांचा हक्क असल्याचे स्पष्ट केले. जे बियाणे सनदशीर मार्गाने मिळत नाही ते वाटेल त्या मार्गाने मिळवून शेतकरी लावतील. शासनाने खरे तर पर्याय ठेवला पाहिजे. शेतकऱ्यांना हवे ते बियाणे ते लावतील. बंदीच आहे तर शेतकऱ्यांना नव्हे, तर निगराणी ठेवणाऱ्या भरारी पथकावर शासनाने कारवाई करावी. जनुकीय बियाणे हीच काळाची गरज आहे.