‘समृद्ध जीवन’ कंपनीचे सर्वेसर्वा महेश किसन मोतेवार यांना सोमवारी उस्मानाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. उस्मानाबादमध्ये दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात मोतेवार यांना पोलिसांनी फरार घोषित केले होते. या प्रकरणी गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी मोतेवार यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर लगेचच सोमवारी उस्मानाबाद पोलिसांनी मोतेवार यांना पुण्यातून ताब्यात घेतले. त्यांना पुढील तपासासाठी उस्मानाबादला नेण्यात येत आहे. उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातील संगम पूलाजवळून मोतेवार यांना ताब्यात घेतले.
डेअरी प्रकल्पामध्ये भागीदारी देण्याचे आमीष दाखवून ३५ लाख रूपयांना फसवल्याप्रकरणी २०१२ मध्ये उमरगा येथील न्यायालयाच्या आदेशाने मोतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला. उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरूम पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ४४८, ४२७, ४९१, ३४ कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. २०१२ मधील या गुन्ह्यात मोतेवार यांना उस्मानाबाद पोलिसांनी फरार घोषित केले होते. गेल्या दोन वर्षांत त्यांच्याविरुद्ध कारवाई न केल्यामुळे पोलिसांवर संशय व्यक्त करण्यात येऊ लागला होता. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. मोतेवार यांना उमरगा न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे.