scorecardresearch

“… अन्यथा सुषमा अंधारेंची सभा उधळून लावणार; राडा तर होणारचं”; उस्मानाबादच्या मनसे जिल्हाध्यक्षाचा इशारा!

“या अंगुपंगुची उद्या नक्कीच पुंगी वाजवण्याचा कार्यक्रम केला जाईल”, असंही म्हणाले आहेत.

“… अन्यथा सुषमा अंधारेंची सभा उधळून लावणार; राडा तर होणारचं”; उस्मानाबादच्या मनसे जिल्हाध्यक्षाचा इशारा!
(लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजारपणावरून केलेल्या टीकेवरून सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना नकलात्मक टीका केली. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चिडल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेचे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट यांनी सुषमा अंधारे यांची उस्मनाबादेत होणार सभा उधळणार असल्याचा इशारा दिला आहे.

प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती देताना राजेंद्र गपाट म्हणाले की, “उद्या उस्मानाबादेत शिवसेना(ठाकरे गट) सुषमा अंधारे यांची सभा आहे, मात्र आम्ही ही सभा उधळून लावणार आहोत. याचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर खुन्शीने टीका केली आहे. वैचारिक खेळीमेळीचं राजकारण असलं पाहिजे अशी आपली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. परंतु सुषमा अंधारे या सध्या प्रसिद्धीच्या झोतात असल्याने त्यांचं भान हरवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर गलिच्छ पद्धतीने नकालत्मक टीका केली आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंची सभा आम्ही उधळून लावणार आहोत. यासाठी आम्ही कोणत्याही पातळीवर संघर्ष करण्यास तयार आहोत.”

याचबरोबर, “राज ठाकरे यांचे आम्हाला आदेश आहेत की, महिलांना योग्य वागणूक दिली पाहिजे. त्याच प्रमाणे राजकारणातील जी ज्येष्ठ लोक आहेत, आम्ही त्यांच्यावर कधी टीका केली नाही. पण आता जर राज ठाकरे यांच्यावर कोणीही टीका करत असतील, म्हणून या अंगुपंगुची उद्या नक्कीच पुंगी वाजवण्याचा कार्यक्रम केला जाईल.” असंही म्हणाले आहेत.

याशिवाय, “सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. त्यांनी जर माफी मागितली तर आमच्या त्यांना सभेसाठी शुभेच्छा असतील. परंतु जर माफी मागितली नाहीतर राडा होणारच.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 23:26 IST

संबंधित बातम्या