scorecardresearch

सांगलीत बिबटय़ा, गव्यानंतर आता पाणमांजर

भारतात १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाणमांजरांना संपूर्ण संरक्षण दिले गेले आहे.

कृष्णाकाठी आढळलेले पाणमांजर

दिगंबर शिंदे, लोकसत्ता 

सांगली : कधी बिबटय़ाची स्वारी, तर कधी गव्याचा मुक्काम सांगलीकरांना धक्का देत असतानाच एरवी संथ वाहत असलेल्या कृष्णेमध्ये आता अत्यंत दुर्मीळ समजल्या जात असलेल्या पाणमांजराचे अस्तित्व आढळले आहे. कृष्णा, वारणा काठ मगरींच्या अस्तित्वाने धोकादायक बनला असताना एरवी प्राणिसंग्रहालयातच पाहण्यास मिळणारे पाणमांजरही सांगलीकरांसोबत सहअस्तित्वाची आस बाळगून आहे. याचे रक्षण तर झालेच पाहिजे, पण नैसर्गिकरीत्या संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. 

जानेवारीच्या पहिल्या व दुसऱ्या आठवडय़ामध्ये डिग्रज बंधारा आणि औदुंबरजवळील अंकलखोप परिसरात पाणमांजराचे दर्शन झाले. मगरीच्या बंदोबस्तासाठी डिग्रज बंधारावर काठावर असणारे वनमजूर इकबाल पठाण व ढवळे ह्यांना मुंगूसासारखा वेगळाच प्राणी नदीच्या काठावर फिरत असलेला दिसला. खात्री करण्यासाठी जवळ जाऊन शोध घेतला असता मुंगूस नसून मुंगूसासारखा एक वेगळाच प्राणी असल्याची खात्री झाली. भ्रमणध्वनीवर छायाचित्र घेऊन या प्राण्याची ओळख मानद वन्यजीव रक्षकामार्फत करण्यात आली. छायाचित्राची चिकित्सा केल्यानंतर  या परिसरात पाणमांजर असण्यावर शिक्कामोर्तब झाले. पाणमांजराला इंग्लिश नाव आहे ऑटर. तो स्टॅलिडे कुळात मोडतो. याचा मांर्जार कुळाशी थेट संबंध नाही. गुळगुळीत कातडीचे पाणमांजर सर्वात मोठे असून त्याचे वजन ७-११ कि.ग्रॅ. असते. शरीर लांब व निमुळते असते. पायांचे पंजे बळकट असतात. विशिष्ट स्नायूंच्या साहाय्याने नाक आणि कान बंद करून ते पाण्यात बुडी मारून भक्ष्य शोधते. पाण्यात बुडी मारल्यानंतर ते ३-४ मिनिटे पाण्याखाली राहू शकतो.  भरपूर पाणी आणि जवळ लपण्याजोगी जागा असणारी सरोवरे, तलाव, नद्या, कालवे, दलदलीच्या जागा, खारुटीची वने आणि दगडांच्या राशी असलेले नदीकिनारे या ठिकाणी पाणमांजरांच्या वसाहती असतात. उंदीर, पाणसाप, बेडूक तसेच छोटे पक्षीही ते खाते. त्यांच्या विणीचा हंगाम सप्टेंबर-फेब्रुवारी महिन्यांत असतो. या हंगामात ते एका जागी स्थिरावतात व तात्पुरती घरे करतात. एका वेळी २-५ पिलांना जन्म देते. पिले दोन महिन्यांनंतर स्वतंत्रपणे पोहू शकतात. पाणमांजराचे आयुष्य ४-१० वर्षे असते. पाणमांजराच्या अधिवासावर मानवी हस्तक्षेप झाल्याुळे त्यांची संख्या वेगाने घटत आहे. आययूसीएन या संस्थेने त्यांचा समावेश अस्तित्व धोक्यात आलेले प्राणी या यादीत केला आहे. भारतात १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार पाणमांजरांना संपूर्ण संरक्षण दिले गेले आहे. रोगट माशांची शिकार करून, या परिसंस्थेची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचे काम ते करतात.  साधारण १५ ते २० वर्षांपूर्वी पाणमांजरांची देशात मोठय़ा प्रमाणावर शिकार झाली. या प्राण्यांच्या कातडीची तस्करी मोठय़ा प्रमाणावर केली जायची. त्याचा इतर देशांमध्ये पर्स, टोपी इत्यादी वस्तू तयार करण्यासाठी उपयोग होत असे. आजही कमी-अधिक प्रमाणात ही तस्करी चालू आहे. सततच्या आणि मोठय़ा प्रमाणावर चाललेल्या तस्करीने पाणमांजर दुर्मीळ आहे. उत्तर भारतात त्यांची संख्या इतकी घटली आहे, की आता नदीच्या काही संरक्षित पट्टय़ांमध्येच त्यांचे अस्तित्व दिसते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Otter found in sangli district zws

ताज्या बातम्या