राष्ट्रीय हरित लवादकडून उद्योजकांना नोटीसा

रमेश पाटील, वाडा

तानसा अभयारण्याच्या हद्दीपासून दहा किलोमीटर अंतरात येत असलेले सर्व प्रदूषणकारी उद्योग बंद करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. या आदेशाची लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचे बोलले जात आहे. या आदेशाची अंमलबजावणी झाली, तर वाडा तालुक्यातील ४००हून अधिक लहान-मोठे उद्योग व्यवसाय बंद होऊन या उद्योगावर अवलंबून असलेले पाच हजार कामगारांना बेरोजगारीला तोंड द्यवे लागणार आहे.

भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने याबाबतीत १० ऑगस्ट २०१४ रोजी तानसा अभयारण्य पर्यावरण संरक्षणसंबंधी अधिसूचना काढून राज्य सरकारला पुढील कार्यवाहीसाठी पाठवली होती. मात्र आजवर राज्य सरकारकडून कुठलीही कार्यवाही न झाल्याने ही अधिसूचना कालबाह्य़ झाली होती. मात्र आता पुन्हा नव्याने याविषयी हालचाली सुरू झाल्याने येथील व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

जैवविविधतेचा ऱ्हास आणि प्रदूषण थांबविण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्राचा समावेश अभयारण्यात करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. वायू, जल, ध्वनी यांचे प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्रात वाडा तालुक्यातील ५६ खेडी येत आहेत. या खेडय़ांतच सुरू असलेल्या प्रदूषणकारी कारखान्यांना लवकरच गाशा गुंडाळावा लागणार आहे. येथील शेतकऱ्यांना आणि वीटभट्टी, कुक्कुटपालन आणि शेळीपालन, तसेच दगड खाणी, दगड क्रशन या व्यावसायिकांवरही टांगती तलवार आहे.

तानसा अभयारण्यापासून देण्यात आलेल्या हवाई अंतराची मर्यादा ही जास्त देण्यात आली आहे, हे अंतर पाच किलोमीटरने कमी केल्यास निम्म्याहून अधिक खेडी या संवेदनशील क्षेत्रातून वाचतील व अनेकांना आपले व्यवसाय पूर्ववत सुरू ठेवता येतील.

– जयेश शेलार, युवा सामाजिक कार्यकर्ता, वाडा.