पाच ते चाळीस हजारांपर्यंत गाढवांची किंमत

प्रकाश खाडे, जेजुरी

ग्रामीण आणि डोंगराळ भागातील उपयुक्ततेमुळे आजच्या आधुनिक काळातही गाढव या प्राण्याचे महत्त्व टिकून असल्याचे जेजुरीतील गाढव बाजारातून दिसून आले. पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त भरलेल्या या पारंपरिक गाढव बाजारात हजारांहून अधिक गाढवे विक्रीसाठी आली होती. त्यातून तब्बल एक कोटी रुपयांची उलाढाल झाली. गावठी गाढवांना पाच ते दहा हजार, तर काठेवाडी गाढवांना वीस ते चाळीस हजार रुपये भाव मिळाला.

उंच डोंगरावर अडचणीच्या ठिकाणी किंवा खोल दरीमध्ये मती, दगड, खडी आदीची वाहतूक करण्यासाठी आणि वीट भट्टय़ांतील कामांसाठी आजही गाढवांचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. त्यामुळेच दरवर्षी भरणाऱ्या गाढवांच्या बाजाराला चांगला प्रतिसाद मिळतो. एखादे वाहन खरेदी करताना ज्या प्रमाणे विविध चाचण्या घेतल्या जातात त्याच पद्धतीने अनेक कसोटय़ा लावून खरेदीदार गाढव खरेदी करतो. अनेक व्यवहार उधारीनेही केले जातात. पुढील वर्षी पैसे देण्याचा वायदा केला जातो. त्यासाठी कोणतेही लिखाण केले जात नाही. विश्वासावर चालणारा हा उधारीवर व्यवहार यंदाही सुरू होता.

गाढव बाजारासाठी काठेवाड, सौराष्ट्र, जुनागड, भावनगर, आमरेली,राजकोट आदी भागातील व्यापारी काठेवाडी गाढवे घेऊन आली होती. ही गाढवे गावठी गाढवांपेक्षा उंच असतात आणि त्यांच्या किमतीही जास्त असतात. एका वेळी ५० ते ६० किलो वजन वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे त्यांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला. खरेदी करताना गाढवांच्या दातांची संख्या पाहिली जाते. त्याचप्रमाणे गरज भासल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणीही घेतली जाते. आधुनिक काळात वाढत्या शहरीकरणात माल वाहतुकीची वेगवेगळी वाहने आली. त्यामुळे गाढवांचा वापर घटला असला, तरी त्याचे महत्त्व कमी झाले नसल्याचे बाजारातील स्थितीवरून दिसून आले. गुजरातमध्ये वाऊथा (जि. अहमदाबाद) येथे सर्वात मोठा गाढव बाजार भरतो. महाराष्ट्रात रंगपंचमीला मढी (जि. नगर), सोनोरी (जि. उस्मानाबाद) येथे होणारे गाढव बाजारही वैशिष्टय़पूर्ण असतात.

दुधासाठी पुण्यातील व्यापाऱ्याकडून गाढव खरेदी

पुण्यातील व्यापारी रमेश गंगाधर जाधव यांनी जेजुरीच्या बाजारातून दूध व्यवसायासाठी आठ गाढवांची खरेदी केली. पुण्यात ते गाढविणीच्या दुधाची विक्री करतात. आयुर्वेदामध्ये गाढविणीचे दूध अनेक विकारांवर उपयुक्त ठरते. नवजात बालकांच्या प्रकृतीलाही ते उत्तम समजले जाते. जाधव यांनी गाढवांसाठी खास गोठा तयार केला आहे. गाढवांकडून ते कोणतेही काम करून घेत नाहीत. केवळ दुधासाठीच त्यांचा वापर केला जातो. गाढविणीचे दूध हे काढल्यानंतर लगेचच सेवन करायचे असते, अन्यथा ते खराब होते. त्यामुळे इतर शहरातून दुधाची मागणी आल्यास वाहनातून गाढविणीला त्या ठिकाणी नेऊन दूध काढून दिले जाते, असे जाधव यांनी सांगितले.