रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरच्या अनधिकृत विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून पुरवठा विभागाच्या धडक कारवाईत मोठा गैरप्रकार समोर आला आहे. ‘सद्गुरु गॅस सेवा’ या नावाने सुरू असलेल्या सर्व्हिस सेंटरवर छापा टाकत अधिकाऱ्यांनी तब्बल १०९४ ग्राहकांच्या गॅस पुस्तिका आणि एक कमर्शियल सिलेंडर जप्त केला.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित केंद्रात ग्राहकांकडून गॅस पुस्तिका जमा करून त्यांच्या नावावर सिलेंडर बुकिंग केले जात होते. त्यानंतर हे सिलेंडर जास्त दराने विकले जात असल्याचा आरोप आहे. काही प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या नावावर सिलेंडर उचलूनही त्यांना प्रत्यक्षात गॅस पुरवठा न झाल्याने हा प्रकार उघड झाला.

सध्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाचल परिसरात काळाबाजार वाढल्याची चर्चा असतानाच पुरवठा विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासणी केली. १ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता छापा टाकण्यात आला. या वेळी दुकानातून एक कमर्शियल भारत गॅस सिलेंडर आणि मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या गॅस पुस्तिका जप्त करण्यात आल्या.

दरम्यान, संबंधित सर्व्हिस सेंटरचे संचालक विलास भिकू कोलते यांनी सर्व आरोप फेटाळले असून, “ग्राहक स्वतःहून आपली गॅस पुस्तिका आमच्याकडे ठेवून जातात. आम्ही गेली ४० वर्षे सेवा देत आहोत,” असे स्पष्टीकरण दिले. या कारवाईवेळी पुरवठा निरीक्षक निलेश लाड, मंडळ अधिकारी पूनम गावित, तलाठी व इतर कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरी आणि परिसरातील विविध गॅस एजन्सींच्या कनेक्शन ट्रान्सफर, बुकिंग प्रक्रिया आणि कार्ड वापराबाबत अधिक सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

या प्रकारामुळे पाचल परिसरात खळबळ उडाली असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.