नवी दिल्ली : देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज सन्मानपूर्वक करण्यात आले. महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना त्यांच्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनातील ‘गणतंत्र मंडप’ येथे आयोजित या समारंभास उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच अन्य केंद्रीय मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना कला क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांच्या पत्नी व खासदार हेमा मालिनी यांनी स्वीकारला. सहा दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवणारे धर्मेंद्र यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. गेल्या नोव्हेंबरमध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

राज्यातील दोन मान्यवरांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांचा समावेश आहे. त्यांनी एका छोट्या बिल डिस्काउंटिंग स्टार्टअपपासून देशातील अग्रगण्य खासगी बँक उभी करून भारतीय बँकिंग क्षेत्रात नवे मानदंड निर्माण केले. कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि आर्थिक धोरण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना गौरविण्यात आले. जाहिरात क्षेत्रातील सर्जनशीलतेचे प्रतीक मानले जाणारे पीयूष पांडे यांना मरणोत्तर ‘पद्मभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या पत्नी नीता जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

पाच मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जनार्दन बापुराव बोठे यांना सामाजिक कार्यासाठी सन्मानित करण्यात आले. ग्रामीण महाराष्ट्रात जलसंधारण आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. रघुवीर खेडकर यांना कला प्रकारातील तमाशा लोककलेसाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

अहिल्यानगर जिल्ह्यतील संगमनेर येथील ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे पुत्र रघुवीर खेडकर असलेले यांनी महाराष्ट्राची पारंपरिक लोककला ‘तमाशा’ जागतिक स्तरावर पोहोचवली आहे. श्रीरंग देवबा लाड यांना कृषी क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

परभणीचे प्रयोगशील शेतकरी आणि भारतीय किसान संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते असलेल्या लाड यांनी ‘दादा लाड तंत्रज्ञान’ विकसित करून कापूस उत्पादन वाढीसाठी मोठे कार्य केले. नागपूरस्थित उद्योजक सत्यनारायण नुवाल यांनी ‘सोलर इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून संरक्षण क्षेत्र आणि खाणकाम उद्योगात मोठे योगदान दिले आहे. मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमी कंडक्टर संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देशाच्या वैज्ञानिक प्रगतीला चालना देणारे इंडियन इ्स्टिटटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रा. जुझर वासी यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यंदाच्या पद्म पुरस्कारांचे वितरण दोन टप्प्यांत होत असून, सोमवारी पहिल्या टप्प्यात देशभरातील ६६ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये दोन पद्मविभूषण, सहा पद्मभूषण आणि ५८ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पद्म पुरस्कार यादीत एकूण १३१ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये ५ पद्मविभूषण, १३ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. एकूण पुरस्कारार्थींमध्ये १९ महिला असून, १६ मान्यवरांना मरणोत्तर सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी निवेदन

मी लोककला क्षेत्रात कार्यरत असल्याने सातत्याने लोकांमध्ये वावरत असतो. त्यामुळे मी जनतेचा सांस्कृतिक प्रतिनिधी आहे, अशी माझी भावना आहे. याच भावनेतून मी माझ्या भागातून जाणार्‍या नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला पुन्हा मंजुरी द्यावी यासाठी रेल्वे मंत्रालयाशी बोलावे, असे निवेदन पदमश्री रघुवीर खेडेकर यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिले. तमाशा कलाकारांच्या प्रश्नाबाबतही त्यांनी अमित शहांना स्वतंत्र निवेदन दिले.