मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांचा अपमान करणारे तसेच शिवसेनेतील अंतर्गत वादात सक्रिय भूमिका बजाविल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तोशेरे ओढलेले माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केंद्राने पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर करून एक प्रकारे महाराष्ट्राचा अपमान केल्याची टीका विरोधकांनी केली.

कोश्यारी यांनी राज्यपालपदी असताना ‘शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत. तर नितीन गडकरी, शरद पवार यांच्यासारखे नेते सध्याच्या काळातील आदर्श आहेत’ अशी मुक्ताफळे उधळली होती. ‘समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल’, असे वादग्रस्त विधानही कोश्यारी यांनी केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक विधाने केल्याबद्दल राज्यात कोश्यारी यांच्याबद्दल राज्यात संतप्त भावना निर्माण झाली होती. राज्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली होती. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयीही कोश्यारी यांनी हिन दर्जाचे विधान केले होते.

‘मुंबई, ठाण्यातून गुजराती, राजस्थानी लोकांना वगळले वा बाजूला काढले तर महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही. मुंबई आर्थिक राजधानी राहू शकत नाही’, असे विधानही कोश्यारी यांनी राज्यपालपदी असताना केले होते.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यासाठी फक्त दोन दिवसांची मुदत दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले होते. राष्ट्रपुरुषांचा सतत अपमान करणे, न्यायालयाच्या आदेशाचा भंग करणे एवढे सारे उद्योग केले. त्यानंतरही कोश्यारी यांना पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर करून केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राचा अपमान केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

न्यायालयाकडून कर्तव्याची जाणीव

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी नावांची शिफारस केली होती. पण कोश्यारी यांनी जवळपास पावणे दोन वर्षे त्यावर काही निर्णयच घेतला नाही. यावरून मुंबई उच्च न्यायालयाने कोश्यारी यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली होती. पण कोश्यारी ढिम्म राहिले. तेव्हा कोश्यारी आणि ठाकरे यांच्यातील संबंधांत कमालीची कटुता आली होती. यातूनच शासकीय विमानातून कोश्यारी यांना प्रवास करण्यास परवानगी देण्यास ठाकरे यांनी नकार दिला होता. पाऊण तास बसून वाट बघूनही परवानगी न मिळाल्याने कोश्यारी यांना विमानातून उतरावे लागले होते.

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात लोकशाही आणि संविधानाची हत्या करून मविआचे सरकार उखडून टाकले. त्यांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले होते. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यांना मोदी सरकार पद्मभूषण देऊन सन्मानित करत असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे. –खासदार संजय राऊत, शिवसेना (ठाकरे)

संविधानाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. शिवाजी महाराज, शाहू, फुलेंचा अपमान करणाऱ्याला हा पुरस्कार देण्यात आला. पुण्यात एका सामाजिक संस्थेने आपल्याला पुरस्कार जाहीर केला होता, मात्र तो भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते देण्यात येणार होता, त्यामुळे पुरस्काराला आपण नकार दिला होता. -हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्याचे काही निकष, पात्रता असते. कोश्यारी यांना कोणत्या निकषांद्वारे पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला, हे केंद्र सरकारने जाहीर करावे, जेणेकरून देशाला त्यांची कामगिरी तरी कळेल. – शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)