अशोक खरात हे नाव सध्या राज्यात चांगलंच चर्चेत आलं आहे. महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात या भोंदू आणि विकृत बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. दरम्यान या प्रकरणात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद सोडावं लागलं आहे. या प्रकरणात आता विविध व्हिडीओ आणि धक्कादायक माहिती समोर येते आहे. दरम्यान अशोक खरातचं कौतुक पद्मश्री पोपटराव पवार यांनी केलं होतं. तो व्हिडीओही आता व्हायरल झाला आहे.

अशोक खरातचं पोपटराव पवार यांनी केलं होतं कौतुक

भोंदूबाबा कॅप्टन खरात याला बलात्कार केल्याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्याचे आता नवे नवे व्हिडिओ समोर येत आहेत. अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांशी तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्याची माहिती समोर आली. सामाजिक क्षेत्रातील ही अनेक व्यक्ती त्याच्याकडे नियमित ऊठबस करत असल्याचं कळतं आहे. अशातच हिवरे बाजार गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांचा कॅप्टन खरात बरोबरचा व्हिडिओ समोर आला आहे. २०११ पासून कॅप्टन खरात यांच्याशी संबंध आल्याचे पोपटराव पवार म्हणाले. हिवरे बाजारातील अनेक मंदिरांच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने अशोक खरात हिवरेबाजार मध्ये तीन दिवस मुक्कामास होता. गावात पाणी येण्यासाठी सांगितले त्याने उपाय सांगितले होते. गावातल्या देवीची पूजा केल्यानंतर फरक पडला असं वक्तव्यही केलं होतं. त्यामुळे आता पोपराव पवारांवर टीका होऊ शकते.

ओशनोलॉजीला आधार आहे असं म्हणाले होते पोपट पवार

भोंदू बाबा अशोक खरात याच्या ओशनोलॉजीला शास्त्रीय आधार असल्याचं पद्मश्री पोपटराव पवार यांनी म्हटलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ जुना आहे तरीही लोक तो व्हायरल करत आहेत. पोपटराव म्हणाले होते, सिंगापूर आणि जपान सारख्या देशांमध्ये चोरांना पकडण्यासाठी पोलिसांकडून ओशनोलॉजीचा वापर केला जातो. दरम्यान, अशोक खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता सध्या खरातचे कुटुंबीय हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्याकडे आश्रयास आहेत. खरात याला लागणारी कायदेशीर मदत आणि आर्थिक रसद पुरवण्यात पोपटराव पवार देखील सहभागी असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पवार यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यात अशोक खरात यांचं कौतुक पोपटराव पवार करताना दिसत आहेत. या कार्यक्रमात रुपाली चाकणकरही उपस्थित असल्याचं दिसून येतं आहे.